सोनेराव गायकवाड
प्रतिनिधी लातूर
लातूर : औसा येथे माऊली प्रतिष्ठान यांच्या वतीने राज्यस्तरीय भजन गायन स्पर्धा दिनांक १२ मार्च शनिवार व रविवार दिनांक १३ मार्च २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचे उद्घाटन औसा येथील मुक्तेश्वर मंदिरात आज दिनांक १२ मार्च रोजी लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री मुक्तेश्वर देवस्थान न्यासाचे अध्यक्ष ॲडवोकेट श्री. मुक्तेश्वरजी वागदरे हे होते. व्यासपीठावर माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा स्पर्धांचे आयोजक पंडित श्री. शिवरुद्रजी स्वामी, कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडवोकेट श्री. मुक्तेश्वर वागदरे, स्पर्धेचे उद्घाटक लोकाधिकारप्रमुख श्री. व्यंकटराव पनाळे, स्पर्धेचे परीक्षक श्री रमेशराव भुजबळ आणि श्री संतोषजी थोरात, तसेच माऊली प्रतिष्ठानचे श्री हणमंतराव लोकरे, ॲडवोकेट श्री भालचंद्र पाटील, श्री गजेंद्र जाधव, श्री ज्ञानदेव लोकरे, श्री नरसिंग राजे हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभ आचार्य विष्णू नारायण भातखंडे यांच्या प्रतिमेला ॲडवोकेट श्री मुक्तेश्वर वागदरे आणि श्री व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. तसेच यावेळी पंडित शिवरुद्रजी स्वामी यांच्या मातोश्री कैलासवासी काशीबाई वैजनाथ स्वामी यांचे नुकतेच दुःखद निधन झाल्यामुळे त्यांना दोन मिनीटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवर आणि परीक्षक यांचा माऊली प्रतिष्ठान च्या वतीने सत्कार करण्यात आला. आज कार्यक्रमाच्या दिवशी योगायोगाने श्री मुक्तेश्वर देवस्थान न्यासाचे विश्वस्त श्री धनंजयराव कोपरे यांचा वाढदिवस असल्याने लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना लोकाधिकारप्रमुख श्री व्यंकटराव पनाळे यांनी भजन आणि गायन हे क्षेत्र संसारिक जीवाची इर्षा संपवून समाधानाकडे घेऊन जाणारा हा मार्ग असल्याचे सांगितले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना श्री मुक्तेश्वर भगवंताच्या दरबारात आपली भक्ती आणि कला सादर करण्याची संधी मिळाली हे सुद्धा स्पर्धकांचे भाग्यच असल्याचे सांगितले. या स्पर्धा आयोजित केल्याबद्दल पंडित श्री शिवरुद्रजी स्वामी आणि माऊली प्रतिष्ठान च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे लोकाधिकार प्रमुखांनी अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ॲडवोकेट श्री मुक्तेश्वर वागदरे यांनी असे सांस्कृतिक कार्यक्रम व राज्य स्तरावरील स्पर्धा घेण्यास मुक्तेश्वर देवस्थान नेहमीच सहकार्य करील. तसेच राष्ट्रीय स्तरावरील जरी स्पर्धा आयोजित केल्या तरी मुक्तेश्वर देवस्थान न्यास आपणास मदत करेल असे आश्वासित केले. स्पर्धेचे प्रारंभी परीक्षक श्री रमेशराव भुजबळ यांच्या गायनाने स्पर्धेला सुरुवात झाली. आज एकूण ४४ स्पर्धकांनी स्पर्धेचे सर्व नियम व अटी पाळून आपला सहभाग नोंदविला. तसेच बाल स्पर्धकांच्या गायन आणि आणि उत्साहाने स्पर्धेत रंगत आली. स्पर्धकांना माऊली प्रतिष्ठान च्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राध्यापक श्री युवराज हलकुडे यांनी केले. स्पर्धेस श्रोता वर्गानेही मनसोक्त दाद दिली.











