मुंबई : पार-तापी-नर्मदा योजनेंतर्गत महाराष्ट्राच्या हद्दीतून दिले जाणारे १५ टीएमसी पाणी गुजरातच्या उकाई धरणाच्या बॅक वॉटरमधून महाराष्ट्राच्या तापी खोऱ्यात परत मिळणे प्रस्तावित आहे. मात्र, गुजरातने या प्रकल्पाला विरोध केला. त्यामुळे त्यावर पुढे कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने महाराष्ट्राच्या हद्दीतील पाणी गुजरातला देण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असा खुलासा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना केला. गोदावरी खोऱ्यात पश्चिमवाहिनी खोऱ्यातून पाणी वळवण्यासाठी प्रस्तावित योजनांपैकी पार-गोदावरी नदीजोड प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे तांत्रिक छाननीच्या अंतिम टप्प्यात आहे. पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी नदीजोड, वळण योजनांद्वारे तापी व गोदावरी खोऱ्यात वळवण्यास राज्य शासनाचे प्राधान्य आहे. उपसा वळण योजना खर्चिक असल्याने प्रवाही वळण योजनांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले. गोदावरी खोऱ्यात पाणी आणण्याच्या सर्व योजनांना गती दिली आहे. बरेच प्रकल्प वनजमिनींमुळे अडकले होते. त्यांनाही गती देण्याचे काम केले आहे. गोदावरी खोऱ्यात वैतरणा-मुकणे वळण योजनेद्वारे ११ टीएमसी पाणी वळवण्याच्या क्षमतेची भिंत बांधणे योजले आहे. ही महाविकास आघाडी सरकारची मोठी कामगिरी आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
नार-पार खोऱ्यातील १५.३२ अब्ज घनफूट पाणी गिरणा, गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी तीन हजार ८६७ कोटी रुपये खर्चून वळण बंधारे बांधले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिकेने पाणी पुनर्वापर प्रकल्प पुरेशा प्रमाणात हाती घेतले नसल्यामुळे वैतरणा धरणातील चार टीएमसी पाणी मराठवाड्यात वळवता येत नाही, असेही ते म्हणाले.


