मुंबई : हवामानात होत असलेल्या सातत्यपूर्ण बदलामुळे राज्याला पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला असून, या बदलत्या वातावरणामुळे मंगळवारी मुंबईत ढगाळ वातावरण होते. तर राज्यभरात कमाल तापमानाची नोंद सरासरीच्या तुलनेत अधिक होत असून, राज्याला देण्यात आलेला पावसाचा इशारादेखील कायम आहे. राज्यात काही ठिकाणी गारपीट होईल, अशी शक्यतादेखील हवामान खात्याने वर्तविली आहे. गेल्या २४ तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. विदर्भात तुरळक ठिकाणी किंचित वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.
उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाड्यात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. ९ मार्च : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होईल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस आणि गारा कोसळतील. विदर्भातही पावसासह विजांचा कडकडाट होईल. १० आणि ११ मार्च : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. १२ मार्च : राज्यात हवामान कोरडे राहील. गेल्या २४ तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. हवामानातील बदलामुळे केरळ किनारा ते कोकण किनाऱ्यापर्यंत १० मार्चपर्यंत महाराष्ट्र, गुजरात, पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेशात गडगडाट व जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडेल. ९ मार्च रोजी मराठवाड्यात गारपिटीची शक्यता आहे.