मुंबई : राज्यातील बहुतेक कोरोना निर्बंध हटविण्याचा निर्णय राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तथापि, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंतिम मान्यतेनंतर याबाबतचा आदेश जारी करण्यात येणार आहे. मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाने सादरीकरण केले. राज्यातील निर्बंध हटविताना संबंधित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीला स्थानिक परिस्थिती बघून निर्णय घेण्याचे अधिकार दिले जातील, असेही सूत्रांनी सांगितले. कोरोनाची परिस्थिती बघून निर्बंधांबाबतचा निर्णय जिल्हा समिती करेल. हॉटेल, चित्रपटगृहे, जिम, स्पामध्ये ५० टक्के उपस्थितीची मर्यादा सध्या आहे. ती पूर्णत: हटविली जाईल, अशी शक्यता आहे. विवाह समारंभासाठी असलेली २०० लोकांच्या उपस्थितीची अट शिथिल केली जाईल वा पूर्णत: उठविली जाऊ शकते. मुख्यमंत्री व टास्कफोर्सशी चर्चा करून त्याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.