केज :
केज तालुक्यातील लव्हुरी येथील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी येथील अतिक्रमणधारकांनी तालुकाध्यक्ष दीपक कांबळे आणि बाळासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दीपक कांबळे, बाळासाहेब ओव्हाळ, बंकट जाधव, पंढरी गायसमुद्रे, गणेश जाधव आणि दादाराव गायसमुद्रे या सहा आंदोलकांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले.
या आंदोलनदरम्यान युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या आदेशानुसार जिल्हा सरचिटणीस राजू जोगदंड, जिल्हा संघटक रवींद्र जोगदंड, तालुका अध्यक्ष किसन तांगडे, अविनाश जोगदंड, मिलिंद पोटभरे भास्कर मस्के, गौतम बचुटे आणि रिपाइं कार्यकर्ते उपस्थित होते.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील लव्हुरी येथील गायरान जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या गायरान जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येऊ नये. म्हणून येथील भूमिहीन मागासवर्गीय समाजातील अतिक्रमणधारकांचा या सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध आहे. गुरुवारी (दि. १०) रोजी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पूजी कागदे यांच्या आदेशानुसार केज तालुका अध्यक्ष दिपक कांबळे यांच्यासह बाळासाहेब ओव्हाळ, बंकट जाधव, पंढरी गायसमुद्रे, गणेश जाधव आणि दादाराव गायसमुद्रे या सहा जणांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलीस पथकाने त्यांच्या हातातील ज्वलनशील द्रव्याचे कॅन हिसकावून घेत त्यांना ताब्यात घेतले.
या आंदोलना दरम्यान जिल्हा सरचिटनिस राजू जोगदंड, जिल्हा संघटक रवींद्र जोगदंड, तालुका अध्यक्ष किसन तांगडे, अविनाश जोगदंड, मिलिंद पोटभरे, भास्कर मस्के, गौतम बचुटे, आणि रिपाइं कार्यकर्ते उपस्थित होते.
काय आहे लव्हुरी प्रकरण?
लव्हुरी (ता. केज) येथील मागास प्रवर्गातील २६ भूमिहीन शेतमजूर हे सुमारे ४० वर्षापासून येथील सरकारी गायरान जमिनी गट नं. ३५/१ मधील ८३ हेक्टर क्षेत्र कसत आहेत. त्या जमिनीत पेरणी करून निघालेल्या उत्पादनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे. दरम्यान अतिक्रमणधारक हे ऊस तोडणीसाठी साखर कारखान्यावर स्थलांतरीत झाले हाेते. यानंतर सौरऊर्जा प्रकल्पाचे काम करणाऱ्या एमएसडीसीएल कंपनीने या गायरान जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम वेगाने सुरू केले आहे. हे काम थांबावे, भूमिहीनांच्या तोंडातील घास हिरावला जाऊ नये म्हणून अनेक वेळा रिपाईंच्या नेतृत्वाखाली निदर्शने व उपोषण केले आहे. परंतु, सदर काम थांबविण्यासंदर्भात कोणताही कार्यवाही न झाल्याने त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे आंदोलकांनी सांगितले.