दिपक पगारे
शहर प्रतिनिधि, औरंगाबाद
औरंंगाबाद, दि.24 अवैधरित्या गांजाची कँनबीस वनस्पती साठवणूक करून विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या युवकास गुन्हेशाखा पोलिसांनी गजाआड केले. मुराद खान महेबुब खान, वय 22, राहणार उस्मानपुरा असे गांजाची साठवणूक करणा-याचे नाव असून पोलिसांनी त्याच्या ताब्यातून तीस हजार 500 रूपये किमतीचा 3 किलो 50 ग्रॅम गांजा जप्त केला असल्याची माहिती गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे यांनी आज दिली.
उस्मानपुरा परिसरातील आशुरखाना जवळ राहणा-या मुराद खान याच्याजवळ गांजाचा साठा असल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती. गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक योगेश धोंडे, पोलिस अंमलदार सैय्यद मुजीब अली, नंदकुमार जैन, गजानन मांन्टे, दत्तात्रय गडेकर, मिलिंद भंडारे, भावसिंग चव्हाण, विरेश बने, राहुल खरात, सुनील मोटे, संजीवनी शिंदे, अजहर कुरैशी आदींच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी घरावर छापा मारला. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.