मुंबई : ‘मुलगी झाली हो’, या मालिकेमधून अभिनेते किरण माने यांना काढल्यानंतर सर्व स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया आल्या. मनोरंजनविश्वात आणि राजकीयविश्वात चांगलीच चर्चा झाली. आता प्रकरणाला वेगळं वळण लागणार का ? असा प्रश्न किरण माने यांनी केलेल्या फेसबुक पोस्टवरून निर्माण झाला आहे. ते म्हणालेत की, “लै खुलासे करायचेत. उद्या प्रेस काॅन्फरन्स घेतोय”, त्यामुळे आता उद्या कोणते गोप्यस्फोट किरण माने करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. “प्रेस काॅन्फरन्स घेतोय उद्या. मुंबईत. …लै खुलासे करायचेत. लै गुपितं उलगडायची हायेत. हा आता माझा एकट्याचा लढा नाय र्हायला. तुम्हा सगळ्यांचा झालाय. तुमी कुठल्याबी क्षेत्रात असा, तुमाला न सांगता-गुपचूप कटकारस्थान करून तुमाला कामावरनं काढायची छाती नाय झाली पायजे कुनाची. कुठलीबी स्त्री असो वा पुरूष..तुमच्यावर खोटे आरोप करताना हजारवेळा इचार करंल असं कायतर करून दाखवतो…संविधानिक मार्गानं.. बघाच तुमी! किरण माने पॅटर्न हितनं फुडं तुमच्यावर कस्लाबी अन्याय होऊ देनार नाय! …आवो, पैशाचा, सत्तेचा, वर्चस्ववादाचा माज एकच गोष्ट उतरवू शकते ‘संविधान’! मला वाटलंवतं की, ह्या अत्यंत क्रूर, निर्दयीपणे केलेल्या अन्यायाबद्दल या यंत्रनेचा ‘अंतरात्मा’ जागा होईल. कुठल्यातरी राजकिय नेत्याला आपला सोत्ताचा संघर्ष आठवंल. पन नाय. ९९% राजकीय नेते भांडलवलदारांचे गुलाम हायेत. माझ्यावर अन्याय करनारी यंत्रना पैशांच्या धुंदीत हाय. “आपण राजकिय नेते खिशात घेऊन फिरतो. काहीही कारस्थान करू. हा कोण क्षुल्लक सामान्य माणूस आपल्याशी लढू पहातोय? अस्सा खड्यासारखा बाजूला करू त्याला”, अशा मग्रूरीत हायेत ही धेंडं. …पन भावांनो, ही मुजोरी-बेबंदशाही मोडून काढण्याचा शेवटचा मार्ग डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हातात ठेवलाय की. आता सुट्टी नाय. जीवाचं रान करीन. रक्ताचं पानी करीन. होत्याचं नव्हतं करीन. पन न्याय मिळवूनच राहीन. जिंकेन नायतर मरेन. जिंकलो, तर तुम्हा सगळ्यांचा विजय आसंल. मेलो…तर मात्र तुम्हा सगळ्यांना मुडद्यासारखं जगत, खाली मान घालून, घाबरत काम करावं लागंल. मान वर केली, आवाज उठवला, बंड केलं तर “एS तुझा किरण माने करेन.” असं सुनावलं जाईल. पन काय बी म्हना. या लोकांनी अन्याय करायला लै चुकीचा मानूस निवडला भावांनो. नाय नाय नाय नाय… लै हार्ड मानसाला हात घातलाय ह्या बेट्यांनी! नाय ह्यांना पळता भुई थोडी केली तर, किरण माने नांव लावनार नाय. उद्या…४ फेब्रुवारी.. दुपारी ३.३० वाजता, मी आणि माझे वकिल असिम सरोदे, रमा सरोदे प्रेस काॅन्फरन्स घेतोय. मुंबई प्रेस क्लब. आझाद मैदान पोलीस स्टेशनसमोर