वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
जवळपास पाच पन्नास गावांची बाजारपेठ तसेच जम्मू ते कन्याकुमारी या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वडकी या अतिशय वर्दळीच्या ठिकाणी दोन वर्षांआधीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मंजूर झालेले शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे काम अजुनही सुरू झाले नाहीत.परीणामी परीसरातील रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.त्यामुळे येथील ग्रामीण रुग्णालयाचे काय झाले हो साहेब ? असा सवाल आता परीसरातील जनतेला नाईलाजाने विचारावा लागत आहेत.
तालुक्यातील वडकी येथून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर सातत्याने अपघाताची मालिका कायम असते.अपघात ग्रस्तांना वेळीच उपचार मिळत नसल्याने अनेकांना उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागत आहेत.तसेच परीसरातील क्रिटीकल अवस्थेतील रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणांसह लगतच्या वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम व सावंगी मेघे येथील रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागतात.हे परीसरातील गोर गरीब नागरिकांना न परवडणारे असुन येथील नागरिकांना वेळीच उपचार मिळत नसल्याचे वास्तव लक्षात घेऊन परीसरातील काही सामाजिक संघटनांनी तसेच येथील नागरिकांनी एकत्रित येऊन वडकी येथे शासकीय ग्रामीण रुग्णालय व्हावे यासाठी अनेक आंदोलनं केली.नागरीकांच्या आंदोलनाच चांगलं फलितही झालं.दोन वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी पालकमंत्री संजय राठोड यांच्या सह राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोक ऊईके यांनी या ठिकाणी ३० बेडचे रुग्णालय मंजूर करून आणले.त्याचा फायदा ही त्यावेळी लोकप्रतिनिधींना झाला हे नाकारता येत नाही.मात्र निवडणुका पार पडताच आता या बाबींकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाहीत व हे वास्तव आहे.रुग्णालय मंजूर झाल्या बरोबर सुरवातीच्या काळात जागेचा तिढा निर्माण झाला होता व तो अजुनही कायम असल्याचे दिसून येत आहे.तर स्थानिक प्रशासन मंजूर रुग्णालयासाठी आपणं जागा उपलब्ध करून दिली असल्याचे सांगतात.तालुका प्रशासन व जिल्हा प्रशासनाने जागेचा तिढा सोडवावा व रखडलेले रुग्णालयाच्या कामाला गती मिळावी यासाठी स्थानिक नागरिकांकडून येत्या काळात राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन केले जाणार असल्याचे देखील कळते.कोरोना या महामारीच्या दुसऱ्या लाटेत कोविडच्या रुग्णाला बेड मिळणं कठीण झाले होते.त्यावेळी वडकी परीसरातील अनेकांचे उपचाराअभावी बळी देखील गेले.त्या अडचणीच्या काळी जर वडकी या ठिकाणी ग्रामिण रुग्णालय असते तर अनेकांना त्याचा फायदा झाला असता व अनेकांची जीवही गेले नसते.मात्र आता हा पाढा वाचून कुठलाही फायदा होणार नसुन आतातरी स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेऊन व लोकप्रतिनिधींनी पुढं येवून रखडलेले ग्रामीण रुग्णालयाचे काम पुर्णत्वास न्यावे एवढीच माफक अपेक्षा.