पुणे : सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन झाले आहे. त्या 75 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीच सिंधुताई यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयातच हर्नियाचे ऑपरेशन करण्यात आले.
सिंधुताई यांच्यावर महिनाभरापासून उपचार सुरु होते. त्यांच्यावर हर्निया संबंधित शस्त्रक्रिया झाल्यानंतर सुरुवातीला त्यांनी उपाचाराला प्रतिसाद दिला. मात्र, आज सकाळपासून त्यांनी उपचाराला प्रतिसाद देणे बंद केले आणि रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी त्यांचे निधन झाल्याची माहिती सिंधुताई यांचे निकटवर्तीय सुरेश वैराळकर यांनी दिली आहे.
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. नको असताना मुलगी झाली म्हणून तिचे नाव चिंधी ठेवले. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरे वळायचे काम करायचे. गाव लहान असल्याने तेथे सुविधांचा अभाव. घरची गुरे राखायला म्हणून रोज सकाळी बाहेर पाठवायचे आणि त्या शाळेत जाऊन बसायच्या. मुळच्याच बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकता आले.
सिंधुताईंनी अनेक खडकर प्रसंगाना तोंड देत हजारो अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे. त्यांना 2012 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता तर 2021 साली पद्मश्री पुसस्काराने सन्मानिक करण्यात आले होते.
सिंधुताई यांनी अन्य समकक्ष संस्थाही स्थापन केलेल्या आहेत त्या याप्रमाणे –
- बाल निकेतन हडपसर, पुणे
- सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह , चिखलदरा
- अभिमान बाल भवन, वर्धा
- गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा ( गोपालन)
- ममता बाल सदन, सासवड
- सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे


