नवी दिल्ली : भारत बायोटेकनं आपल्या इन्ट्रानेजल कोविड वॅक्सीनच्या बूस्टर डोसच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची परवानगी मिळावी, यासाठी निवेदन दिलंय. विश्वसनीय सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजे DCGIकडे बूस्टर डोसच्या चाचणीसाठी भारत बायोटेकनं परवानगी मागितली आहे. इन्ट्रानेजल लस ही नाकाद्वारे दिली जाते. या बूस्टर डोसमुळे व्हायरसला शरिरात जाण्यापासून रोखण्यास मदत मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे. याच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी डीसीजीआयला निवेदन देण्यात आलंय.
संसर्गही रोखणार?
तिसऱ्या टप्प्यातील ही चाचणीनंतर इन्ट्रानेजल लस बूस्टर म्हणून दिली जाऊ शकते, असा विश्वास भारत बायोटेकनं व्यक्त केला आहे. सोबत संसर्ग रोखण्यातही ही लस प्रभावीपणे काम करु शकेल, असंही सांगितलं जातंय. या बूस्टर डोसमुळे कोरोना व्हायसरचं संक्रमणही थांबेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
काय म्हणाले भारत बायोटेकचे अध्यक्ष?
भारत बायोटेकचे अध्यक्ष कृष्ण एल्ला यांनी या बूस्टर डोसबाबत महत्त्वपूर्ण दावा गेल्या महिन्यातच केला होता. संसर्ग रोखण्याचं काम करणारी लस संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल, असं म्हणत त्यांनी इंट्रानेजल डोसबाबत कल्पना दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी कोविड लसीचा दुसरा डोस नाकावाटे दिल्या, संसर्ग रोखण्यात मदत मिळेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. ज्या गोष्टीची संपूर्ण जग वाट पाहतं, त्याचा शोध भारत बायोटेकनं सगळ्यात पहिला लावला असल्याचाही दावा त्यांनी केलाय.
लहान मुलांसाठीची लस तयार
जगभरात ओमिक्रॉनचा फैलाव आणि भीती पसरली असतानाच भारतीयांसाठी आणि जगासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली होती. कारण सीरम इन्स्टिट्यूटनं लहान मुलांसाठी तयार केलेल्या कोरोना लसीला (Covovax) ‘WHO’कडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे 12 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांना लवकरच लस मिळेल. त्यामुळे लहान मुलांचं आता लवकरच लसीकरण करण्यास सुरूवात केली जाण्याची शक्यताही बळावली आहे.सीरमच्या आदर पुनावाला यांनी नुकतंच ट्विटर करून लहान मुलांसाठी तयार केलेल्या कोरोना लसीला (Covovax) ‘WHO’कडून मंजुरी मिळाल्याची माहिती दिली होती. राज्यात ओमिक्रॉनचा फैलाव वाढत होता, अशात राज्य सरकारकडून लसीकरणाची वयोमर्यादा कमी करण्याचा विचार सुरू होता, मात्र आता ती वेळ टळणार आहे. लहान मुलांसाठी वेगळी लस तयार आहे. त्यांना 18 वर्षे वयोगटावरील लस देऊन जोखीम पत्करण्याची आता गरज उरली नाही, सीरमने 12 ते 17 वयोगटातील मुलांसाठी वेगळी Covovax ही लस तयार केली आहे. त्यामुळे आता लवकरच लहान मुलांचे लसीकरण करण्यास सुरूवात केली जाऊ शकते.


