अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगांव -अकोला भाजपा जिल्हा अध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला मतदार संघातील शेगाव ते पंढरपूर पालखी मार्गाच्या प्रश्नासाठी 15 जून ला जनआंदोलन छेडण्याचा इशारा देताच प्रशासन खळबळुन जागे झाले आणि मार्गाच्या कामाला सुरुवात झाली.त्यात मेडशी ते डव्हा पालखी मार्गाची मागणी होती मग मेडशी ते डव्हा पालखी मार्गातील मोर्ना नदीवरील पूल पाडून 5 महिन्याचा कालावधी उलटूनही काम ठप्प असल्याने मेडशी गावावरच अन्याय का? मेडशी गाव लोकसभा मतदार संघात येत नाही का? असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.मेडशी ते डव्हा मार्गाचे काम संथ गतीने होत असतांना कंत्राटदाराने मेडशी ते डव्हा मार्गाला जोडणारा मोर्ना नदीवरील पुल 5 महिन्या पूर्वीच पाडल्याने दळणवळण ठप्प झाले. ब्राम्हणवाडा,सुकांडा,कुरळा,डव्हा आदी गावासह इतर गावाशी संपर्क तुटला. शेतकऱ्यांच्या शेती मशागतीचा प्रश्न ऐरणीवर आल्याने येथील कास्तकर रहेमान गौरे यांनी कंपनीच्या विनंतीवरून स्वतःच्या शेतातून रस्त्याची तात्पुरती व्यवस्था केल्याने मशागतीचा प्रश्न मिटला मात्र पुलाची डिझाईन तयार नसल्याने पुलाचे काम रखडले.आता शेतकऱ्यांच्या पेरणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कंत्राटदार चालढकल करत असल्याने पावसामुळे शेती खरडून जाण्याच्या भीतीने रहेमान गौरे यांनी रस्ता खोदनार असल्याचे सांगितल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. इतरही शेतकऱ्यांची शेती खरडून जाणार असल्याने पुलाचे काम तात्काळ सुरू करणे आवश्यक आहे. आमदार रणधीर सावरकर यांनी सदर प्रकरणात लक्ष घालून पुलाचा प्रश्न मार्गी लावावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.


