पठाण जैद
तालुका प्रतिनिधि औसा
औसा लातुर : राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचा-याचा बेमुदत संप सलग चौथ्या दिवशीही सुरूच आहे. या संपामुळे दीपावली या सणाच्या तोंडावर प्रवासी जनतेचे मात्र हाल होत आहेत.
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या एसटी कर्मचा-याच्या आंदोलनात औसा आगारातील सर्व वाहक, चालक कर्मचारी सहभागी झाले असून आगाराच्या प्रवेश दाराजवळ या कर्मचा-यानी चार दिवसांपासून ठिय्या मांडला आहे.
संयुक्त कृती समितीचे माणिक बडे, अमोल रंधवे, अनिल मोरे विठ्ठल कांबळे, परमेश्वर मुळे, महेश लंगर, मल्लिकार्जुन निगुडगे, अमोल सातपुते, रमाकांत सगर,नागनाथ मेकले यांच्या प्रमुख नेतृत्वात औसा आगाराचे सर्व कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत तुटपुंजे व अनियमित वेतन यामुळे राज्यातील ३२ कर्मचा-यानी आत्महत्या केली आहे आता त्यांचे कुटुंबीय आत्महत्येच्या प्रयत्नात असून एका कर्मचा-याच्या मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे .
एसटी कामगारावर ही दुर्दैवी वेळ येऊन ही सरकार एसटी कर्मचा-यांचा संपाकडे सकारात्मकतेने पाहत नाही. बारा-बारा तास काम करूनही चालक व वाहकांना वेळेवर वेतन मिळत नाही त्यामुळे कर्मचा-याच्या कुटुंबात अनेक समस्या भेडसावत आहेत मुलांचे शिक्षण, आरोग्याचे प्रश्न, कौटुंबिक जबाबदा-या पार पाडत असताना कुटुंब प्रमुख कर्मचारी मानसिक तणावात आहेत. एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी राज्यभर निवेदने देण्यात आली परंतु त्याची दखल शासनाने अद्याप घेतली नसल्यामुळे अखेर कर्मचा-यानी संपाचे हत्यार उपसले आहे. या संपामुळे प्रवासी जनतेची गैरसोय होत असून आम्ही दिलगीर आहोत अशी प्रतिक्रिया संपात सहभागी झालेल्या कर्मचा-यांनी व्यक्त केली .


