अकोला,दि.6- निवडणूक विभाग आणि बृहमुंबई सार्वजनिक गणेशेात्सव समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उत्सव गणेशाचा जागर मतधिकाराचा’ हा विषय घेऊन उपक्रमाअंतर्गत घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेबरोबरच सार्वजनिक गणेश मंडळामार्फत निवडणूक आयोगाचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम, मतदार नाव नोंदणी आणि वगळणी यासाठी प्रसार-प्रचार केला जाणार आहे. गणेश मंडळाच्या मंडपात आणि ऑनलाईन माध्यमांद्वारेही ही जागृती केली जाणार असून नागरिकांनी जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे व बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी केले आहे.
दरवर्षी भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला गणेश भक्तांच्या घरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये श्री गणेशाचे आगमन होते. स्वातंत्र्यपूर्व काळात समाज प्रबोधनासाठी सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आजही त्याच हिरिरीने जपतो आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून यंदा निवडणूक विभाग व बृहमुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उत्सव गणेशाचा जागर मतधिकाराचा’ हा विषय घेऊन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांना देखाव्याच्या आयोजनावर असलेली बंधने लक्षात घेऊन घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. यात गणेश मखराची सजावट, गणेश दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्ये, नातेवाईकांमध्ये मतदार नाव नोंदणी, वगळणी यासंबंधीची जागरूकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवता येतील. तसेच मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ, निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे यांसारख्या विषयांवर घरगुती गणेशोत्सव सजावटीतूनही जागृती करता येऊ शकते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धेची नियमावली पुढील प्रमाणे :
स्पर्धेची नियमावली :
1. सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
2. स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकाने पुढीलप्रमाणे साहित्य पाठवावे :
i) विषयाला अनुसरून केलेल्या सजावटीचे विविध कोनांतून काढलेले पाच फोटो पाठवावेत.
ii) फोटो मूळ स्वरूपातील असावेत, त्यावर कोणाचेही नाव, लोगो, चित्र, फ्रेम, डिजाइन, असे अधिकचे काही जोडू नये.
iii) प्रत्येक फोटो हा जास्तीत-जास्त 200 केबी साइजचा व जेपीजी फॉरमॅटमध्येच असावा. पाचही फोटोंची एकत्रित साइज 1 एमबीपेक्षा जास्त असू नये.
iv) आपल्या सजावटीची ध्वनिचित्रफीत पाठवताना, ती कमीत-कमी 30 सेकंदांची आणि जास्तीत-जास्त एक मिनिटाची पाठवावी.
v) चित्रफीत (व्हिडिओ) अपलोड करताना, मूळ रूपात आहे त्या स्वरूपात पाठवावी, कोणत्याही प्रकारे संपादित (एडिटिंग) करू नये. चित्रिकरण करताना देखाव्याचे वर्णन करतानाचा आवाज मुद्रित (रेकॉर्ड) केल्यास चालेल.
vi) ध्वनिचित्रफितीची (व्हिडिओची) साईज जास्तीत-जास्त 100 एमबी असावी. तसेच, ही ध्वनिचित्रफित एमपी फोर (mp4) फॉरमॅटमध्ये असावी.
3. स्पर्धेसाठी निश्चित केलेल्या विषयावर पाच फोटो आणि चित्रफीत पाठवणाऱ्या स्पर्धकाचाच अर्ज ग्राह्य धरला जाईल.
4. आपले फोटोआणि चित्रफीत https://forms.gle/6TxQHaKSAhZmBbQFA या गूगल अर्जावरील माहिती भरून त्यावरपाठवावेत.
5. ज्या स्पर्धकांना फोटो किंवा चित्रफीत (व्हिडिओ) पाठवण्यास अडचण येईल, त्यांनी अविराज मराठे – 7385769328, प्रणव सलगरकर- 8669058325 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश (मेसेज) पाठवावे.
6. दिनांक 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2021 या काळात आलेले साहित्यच स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल.
7. बक्षिसांचे स्वरूप प्रथम क्रमांकासाठी 21 हजार, द्वितीय क्रमांक 11 हजार , तृतीय क्रमांक 5 हजार व उत्तेजनार्थ 1 हजार रुपयांची एकूण दहा बक्षिसे राहिल.
8. सहभागी सर्व स्पर्धकांना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमाणपत्र देण्यात येईल.
9. आलेल्या सजावटींमधून सर्वोत्तम सजावटी निवडण्याचा अंतिम निर्णय परीक्षक आणि आयोजक यांच्याकडे राहील.
10. स्पर्धकाने पाठवलेल्या साहित्यावर अन्य कुणी स्वामित्व हक्क सांगितल्यास त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी स्पर्धकाची असेल.
11. स्पर्धेतील उत्कृष्ट साहित्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या समाजमाध्यमांवर प्रसारित केले जाईल.
दिनांक 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघाच्या छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनरीक्षणांचा कार्यक्रम 1 नोव्हेंबर पासून सुरु होत आहे. यामध्ये 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या नवमतदारांच्या नोंदणीसाठी अर्ज स्विकारले जातील. कार्यक्रमानुसार अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे इत्यादी करीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे आवश्यक फॉर्म भरून देण्यात यावे. मतदार यादीतील दुबार, स्थलांतरीत, मयत मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही सुध्दा प्रस्तृत मोहिमेत घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपले विहीत नमुन्यातील अर्ज भरून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेमार्फत मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे देण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.


