नांदेड , दि. 3 :- मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने 3 सप्टेंबरला दिलेल्या सूचनेनुसार 3 ते 7 सप्टेंबर या कालावधीत नांदेड जिल्ह्यासाठी येलो (Yellow) अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह व ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. रविवार 5 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. येत्या 6 व 7 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी पुढील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना : काय करावे आणि काय करु नये याबाबत विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.
पुढील गोष्टी करु नका : आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.
पूर परिस्थितीत : काय करावे आणि काय करू नये
पूर येण्यापूर्वी : अफवांकडे दुर्लक्ष करा, शांत रहा, घाबरू नका. आपत्कालीन परिस्थितीसाठी एस.एम.एस. चा उपयोग करा. आपले मोबाईल फोन चार्ज करून ठेवा. हवामानातील बदलांची अद्ययावत माहितीसाठी रेडीओ ऐका, टी.व्ही. पहात रहा, वर्तमानपत्र वाचत रहा. गुरेढोरे /पशूच्या सुरक्षिततेची सोय सुनिश्चित करून घ्या. सुरक्षित जगण्यासाठी आवश्यक वस्तूंसह आपत्कालीन कीट तयार ठेवा. आपली कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू जलरोधक (वाटर-प्रूफ) बॅग मध्ये ठेवा. जवळपास असलेली निवारा/पक्के घराकडे जावयाचे सुरक्षित मार्ग जाणून घ्या. सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशनाचे पालन करा. कमीत कमी एका आठवड्यासाठी पुरेसे खाण्याजोगे अन्न आणि पिण्यासाठी पाणी साठवा. पूर असलेल्या क्षेत्रातील कालवे, नाले, ड्रेनेज वाहिन्या यापासून नागरिकांनी सतर्क/जागरूक रहावे.
पूर दरम्यान : प्रवाहात प्रवेश करू नका. सिवरेज लाईन, गटारे, नाले, पूल,नदी, ओढे इत्यादी पासून दूर रहा. विद्युत खांब आणि पडलेल्या वीज लाईन पासून दूर रहा. ओपन ड्रेन किंवा धोक्याच्या ठिकाणी चिन्हे (लाल झेंडे किंवा बॅरीकेड्स) सह चिन्हांकित करा. पुराच्या पाण्यामध्ये चालू नका किंवा गाडी चालवू नका. लक्षात ठेवा, दोन फुट वाहणारे पुराचे पाणी मोठ्या मोटारींना सुद्धा वाहून नेऊ शकते. ताजे शिजलेले किंवा कोरडे अन्न खा. आपले अन्न झाकून ठेवा. उकळलेले / क्लोरीन युक्त पाणी प्या. आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जंतुनाशकाचा वापर करा.
पूर येऊन गेल्यानंतर : मुलांना पुराच्या पाण्यामध्ये किंवा जवळपास खेळू देऊ नका. कोणतीही खराब झालेली विद्युत वस्तू वापरू नका, त्यापूर्वी तपासणी करा. सूचना दिल्या असल्यास, मुख्य स्विचेस आणि विद्युत उपकरण बंद करा तसेच ओले असल्यास विद्युत उपकरणांना स्पर्श करू नका. तुटलेली विद्युत खांब आणि तारे, तीक्ष्ण वस्तू आणि मोडतोड अथवा पडझड झालेल्या वस्तूंपासून सावध रहा. पुरातील पाण्यात वाहून आलेले अन्न खाऊ नका. मलेरिया पासून बचाव करण्यासाठी डासांच्या जाळीचा वापर करा. सापांबद्दल सावधगिरी बाळगा कारण पुरामध्ये सर्पदंश होण्याची शक्यता असते. जर गटार लाईन फुटली असेल तर शौच्यालयाच्या किंवा पिण्याच्या पाण्याचा नळ वापरू नका.आरोग्य विभागाने सांगितल्याशिवाय नळाचे पाणी पिऊ नका.
पूर आल्यावर सुरक्षित ठिकाणी जाण्याची वेळ आल्यास : घरातील वस्तू पलंगावर आणि टेबल्सवर ठेवा. शौच्यालयाच्या वाडग्यात वाळूच्या बॅग्स ठेवा आणि सांडपाणी परत येऊ शकते (बॅक फ्लो). ते टाळण्यासाठी सर्व ड्रेन होल झाकून ठेवा. वीज आणि गॅस कनेक्शन बंद करा. उंच मैदान/सुरक्षित निवारा येथे जा. आपत्कालीन कीट, प्रथमोपचार बॉक्स, मौल्यवान वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे आपल्या बरोबर घ्या. खोल, अज्ञात पाण्यात प्रवेश करू नका; पाण्याची खोली तपासण्यासाठी काठी वापरा. जेंव्हा सक्षम अधिकारी आपल्या घराची तपासणी करून ते राहण्यास योग्य असल्याबाबत सांगतील व घरी परत जाण्याची परवानगी देतील तेंव्हाच घरात प्रवेश करा. कौटुंबिक संप्रेषण योजना बनवा.ओली झालेली प्रत्येक गोष्ट स्वच्छ आणि निर्जंतुक करा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी केले.