खून, अपघात आणि बेफाम वाहनांचा तडाखा; वढोलीसह तालुका भीतीच्या छायेत नितेश डोंगरे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर गोंडपिपरी :– गेल्या काही दिवसांत गोंडपिपरी तालुक्यात घडत असलेल्या सलग दुर्दैवी घटनांनी संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. अपघात, खून आणि संशयास्पद मृत्यूंच्या मालिकेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या वाहन अपघातात एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर आक्सापूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू दोन जखमी झाल्याने तालुक्यावर शोककळा पसरली.दरम्यान, वढोली येथे किरकोळ कारणावरून पेटलेल्या वादाने भीषण रूप घेत एका तरुणाचा जीव घेतला. अवघ्या 20 वर्षीय वैभववर चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून युवकांमध्ये वाढत्या हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.याच मालिकेत आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोंडपिपरीतील उद्योजक अनिल सूरकर यांच्या भरधाव कारने एका व्यक्तीला जबर धडक देत अक्षरशः हवेत उडविले. या भीषण अपघातात त्या राजू बुटलेचा मृत्यू झाला असून गावकरी संतापले आहेत. या घटनेनंतर दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच, गोंडपिपरी शहर व लाठी परिसरात आढळून आलेल्या दोन अज्ञात मृतदेहांमुळे गूढ अधिकच गडद झाले असून त्यांच्या ओळखीचा व मृत्यूच्या कारणाचा तपास सुरू आहे.दरम्यान, सुरजागड परिसराकडे वाढलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्यांवर जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली आहे. ट्रॅफिक नियंत्रणाचा अभाव, प्रशासनाची उदासीनता आणि आमदार, लोकप्रतिनिधींचे मौन यामुळे सामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. घटना घडल्यानंतरच प्रशासन हलते, अशी तीव्र टीका होत असून तातडीने ठोस उपाययोजना करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.










