वढोलीत वादाचे रक्तरंजित रूप; चाकू हल्ल्यात जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोपी फरार!
नितेश डोंगरे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथे रविवारी (दि. १९) सायंकाळी नागमंदिर परिसरात घडलेल्या घटनेने परिसर हादरला आहे. मैत्रीपूर्ण गप्पा रंगलेल्या वातावरणात अचानक जुन्या किरकोळ कारणावरून दोन युवकांमध्ये वाद उसळला आणि त्याचे रूपांतर थेट हिंसक हल्ल्यात झाले. या वादातून वैभव साईनाथ आळे (वय २०) याच्यावर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला.सदर घटनेत परिमल झाडे याने संतापाच्या भरात वैभववर वार केल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला शाब्दिक वादातून सुरू झालेला संघर्ष काही क्षणांतच हातपाईवर आला आणि त्यानंतर चाकू हल्ल्याने परिस्थिती गंभीर बनली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.गंभीर जखमी झालेल्या वैभवला गावकऱ्यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले. तेथे शस्त्रक्रिये दरम्यान सोमवारी पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली.घटनेची माहिती मिळताच गोंडपिपरी पोलिस ठाण्याचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे व पीएसआय मंगेश कराडे यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. दरम्यान आरोपी परिमल झाडे फरार असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. वैभवच्या पश्चात आई-वडील आणि लहान भाऊ असा परिवार असून या दुर्दैवी घटनेने वढोली गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.










