नितेश डोंगरे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
चंद्रपूर-कोठारी मार्गावरील आक्सापूर लगतच्या जंगल परिसरात शनिवारी (दि. १८ एप्रिल) रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने धावणाऱ्या पिकअपने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिल्याने एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून विठ्ठलवाडा गावावर दुःखाचे सावट पसरले आहे.या अपघातात शिमोन डोनू गणवीर (वय ५३, रा. विठ्ठलवाडा) यांचा जागीच मृत्यू झाला. ते आपल्या मुलगा रोहित (वय २५) आणि मुलगी ईशा (वय २२) यांच्यासह कारने चंद्रपूरहून गावाकडे परतत होते. त्याचवेळी गोंडपिपरीकडून कोठारीकडे भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअपने (क्रमांक MH 34 BG 8976) त्यांच्या कारला (MH 34 BR 0859) समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला आणि गणवीर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच सुरजागड पेट्रोलिंग पथकाचे अधिकारी प्रदीप येल्लुरे आणि कोठारी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तत्काळ कोठारी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले. या अपघाताचा पुढील तपास कोठारी पोलिसांकडून सुरू असून या घटनेने गणवीर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.









