भू-मातेची पूजा, बैलांची वंदना आणि शेतकऱ्यांचा उत्साह; परंपरा जपत कृषी वर्षाची सुरुवात
राजेश आमेटवार
ग्रामीण प्रतिनिधी : बिलोली
बिलोली : आपल्या मराठी संस्कृतीमध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीया या पावन पर्वाच्या निमित्ताने कासराळी येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने शेती मशागतीला मोठ्या उत्साहात प्रारंभ केला. शेतकऱ्यांचा खरा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवशी शेतात जाऊन भू-मातेची विधिवत पूजा करण्यात आली आणि ‘तास’ करून नवीन कृषी वर्षाचे स्वागत करण्यात आले.
या विशेष प्रसंगी कासराळी येथील भूमिपुत्र तसेच गृह विभागात प्रामाणिक सेवा बजावणारे पोलीस कर्मचारी संजय चरकुलवार यांनी स्वतः औत जुंपून शेतीच्या कामाला प्रारंभ केला. आपल्या कर्तव्याबरोबरच मातीतले नाते जपणारे चरकुलवार यांनी काळ्या मातीत असलेले प्रेम प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.
विशेष म्हणजे, आजच्या आधुनिक युगात बहुतांश ठिकाणी यांत्रिक शेतीला प्राधान्य दिले जात असताना चरकुलवार परिवाराने पारंपरिक पद्धतीचा वारसा जपत शेतीची मशागत केली. ज्याला शेतीचे खरे धन मानले जाते असे बैल आजही त्यांनी शेतीकामासाठी वापरून परंपरेचा सन्मान जपला आहे. त्यांच्या या उपक्रमातून आधुनिकतेसोबतच संस्कृतीचे जतन करण्याचा आदर्श संदेश दिला गेला.
अक्षय तृतीया हा दिवस शेतीसाठी अत्यंत मंगल मानला जातो. या दिवशी सुरू केलेले काम अक्षय राहते, अशी शेतकऱ्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे कासराळीसह परिसरातील अनेक शेतकरी या दिवशी शेतात जाऊन मशागतीची सुरुवात करतात. यंदाही शेतकऱ्यांनी मोठ्या भक्तिभावाने भूमातेचे पूजन करून बैलांची सजावट केली व त्यांची वंदना करून शेतीकामाचा शुभारंभ केला.
यावेळी चरकुलवार परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. सहपरिवार शेतातच पारंपरिक पद्धतीने जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सर्वांनी एकत्र येऊन ग्रामीण संस्कृतीचा आनंद लुटला. शेतातील वातावरण, निसर्गाची सान्निध्यता आणि परंपरेची सांगड यामुळे हा सोहळा अधिकच रंगतदार झाला.
कासराळी परिसरात अशा प्रकारे परंपरा, श्रद्धा आणि निसर्गाशी असलेले अतूट नाते जपत शेतकऱ्यांनी अक्षय तृतीया हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. या उपक्रमातून नव्या कृषी वर्षासाठी सकारात्मक ऊर्जा मिळाली असून, आगामी हंगाम समृद्ध होण्याची आशा व्यक्त करण्यात आली.









