मकरंद जाधव तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन
श्रीवर्धन तालुक्यातील खारगाव ग्रामपंचायत कार्यालयात दि.१७ एप्रिल रोजी मंडळस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान उत्साहात आणि मोठ्या प्रतिसादात पार पडले. या अभियानाचा उद्देश नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी जलद आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देणे हा होता. या शिबिराला श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी महेश पाटील आणि तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील सर्व घटकांना आवश्यकतेनुसार अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, कृषी कार्ड, तसेच वयोवृद्ध नागरिकांसाठी हयातीचे दाखले आणि शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे लाभार्थ्यांना तात्काळ वितरित करण्यात आली. ‘जिवंत सातबारा’ मोहिमेअंतर्गत मयत खातेदारांच्या वारसांना सातबारा उतारे देण्यात आले, ज्यामुळे अनेक कुटुंबांना त्यांच्या जमिनीच्या नोंदी व्यवस्थित करण्यास मोठा दिलासा मिळाला. या उपक्रमामुळे नागरिकांची कार्यालयीन दिरंगाई टळून त्यांचा वेळ आणि खर्च दोन्हीची बचत झाली. कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी विविध शासकीय योजनांबाबत माहिती घेतली तसेच आपले प्रश्न थेट अधिकाऱ्यांसमोर मांडले. प्रशासनानेही नागरिकांच्या अडचणी ऐकून तत्काळ मार्गदर्शन केले, त्यामुळे हा उपक्रम ‘प्रशासन आपल्या दारी’ या संकल्पनेला साजेसा ठरला. याप्रसंगी नायब तहसीलदार मनोज माने, उपाधीक्षक भूमी अभिलेख सोमनाथ कोरके, निमतादार भूमी अभिलेख प्रशांत जाधव, पुरवठा विभागाचे हरिश्चंद्र पाटील, रामदास रायकर, खारगाव सरपंच अमोल पुसाळकर, शेखाडी सरपंच बबन पाटील, नागलोली सरपंच विजय पाडावे, ग्राम महसूल अधिकारी प्रदीप देवकांत, प्रदीप डावरे, अशोक काळे, सुरज सोनूले, मनोज जोंधळे, नंदा बगमारे तसेच महसूल सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी आणि आपले सरकार सेवा केंद्र चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









