मारोती बारसागडे जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली– सुरजागड येथील लायड मेटल अँड एनर्जी लिमिटेड च्या लोहखनिज वाहतुकीदरम्यान पुन्हा एकदा गंभीर अपघाताची घटना समोर आली आहे. दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ९:०० वाजताच्या सुमारास, चामोर्शी येथील जुन्या लक्ष्मी गेटजवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भरधाव वेगाने आणि ओव्हरलोड लोहखनिज घेऊन जाणाऱ्या ट्रकने (क्र. CG 04 PT 1651) समोरून येणाऱ्या कारला (क्र. MH 14 GV 8998) जोरदार धडक दिली.या अपघातात कारचालक रुपेश यशवंत लाड (वय ४०, रा. चामोर्शी) यांच्या कारचा उजवा भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला. कारमध्ये त्यांची पत्नी श्रुतिका रुपेश लाड (वय ३५), मुलगी वेदश्री (वय ६) व लावण्य (वय १) प्रवास करत होते. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.घटनेनंतर माजी पंचायत समिती उपसभापती यशवंत लाड , मुरखळा( माल ) चे माजी सरपंच भुदेवी लाड , श्रुतिका लाड या संतप्त कुटुंबीयासह स्थानिक नागरिकांनी तात्काळ रास्ता रोको आंदोलन करत सुमारे २ तास वाहतूक ठप्प ठेवली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.चामोर्शी पोलीस निरीक्षक दीपक डोंम यांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांशी चर्चा केली व संबंधित ट्रक चालकावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे दरम्यान,सुरजागड परिसरातून होणाऱ्या ओव्हरलोड व भरधाव ट्रक वाहतुकीमुळे वारंवार अपघात होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.चामोर्शी शहरातून जाणाऱ्या अशा वाहतुकीवर तात्काळ नियंत्रण आणावे, वेगमर्यादा काटेकोरपणे लागू करावी, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.









