ज्ञानदेव राजनकर
तालुका प्रतिनिधी
जळगांव जामोद
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे ३७० वर्षांची परंपरा असलेली प्रसिद्ध घटमांडणी आज १९ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सायंकाळी होणार आहे. या मांडणीतून मिळणाऱ्या पीक-पाणी, राजकीय आणि सामाजिक संकेतांकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. विशेषतः सध्याच्या तणावपूर्ण वातावरणात युद्धाबाबत काय संकेत मिळतात, याची उत्सुकता आहे.
३७० वर्षांची अनोखी परंपरा पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या भेंडवळ गावात दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सायंकाळी ५:३० वाजता घटमांडणी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयावेळी त्याआधारे वर्षभराचे अंदाज जाहीर केले जातात. ही केवळ पीक-पाण्याची भविष्यवाणी नसून, देशाची आर्थिक-राजकीय स्थिती, नैसर्गिक आपत्ती आणि परकीय संकटांचेही संकेत यात मिळतात, असा शेतकऱ्यांचा दृढ विश्वास आहे.
ही ३७० वर्षे जुनी परंपरा असून, शेतकऱ्यांसाठी तिचे सांस्कृतिक आणि भावनिक महत्त्व मोठे आहे. या भाकितांवरून अनेक शेतकरी आपल्या वर्षभराच्या शेतीचे नियोजन करतात. त्यामुळे, या मांडणीकडे केवळ बुलढाणा जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असते.
अलीकडेच झालेल्या इराण – अमेरिका मधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भेंडवळच्या घटमांडणीत युद्धाबाबत काय संकेत मिळतात, याकडे सर्वांची उत्सुकता आहे.
दुसरीकडे, या घटमांडणीला कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे म्हणणे आहे.









