अविनाश पोहरे / ब्युरो चिफ
अकोला- महाबीज सोयाबीन बियाणे वितरणामध्ये निर्माण झालेल्या विविध प्रकारच्या घोळांमुळे शेतकऱ्यांना महाबीज सोयाबीन बियाणे मिळत नव्हते. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्या नेतृत्वात शुक्रवारी झालेल्या आंदोलनानंतर बियाणे वितरण सुरळीत होणार आहे.
पेरणीचे दिवस जवळ येऊनही शेतकऱ्यांना महाबीजचे सोयाबीन बियाणे मिळाले नाही. पहाटे पाच वाजता पासून रांगेत लागूनही बियाणे मिळत नसल्याने शेतकरी वैतागले. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात धडक देऊन याप्रकरणी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांसाठी बियाण्याची माहिती मिळावी यासाठी हेल्पलाइन सुरू करावी, प्रत्येक कृषी केंद्राबाहेर उपलब्ध बियाणे साठ्याबाबत दर्शनी फलक लावावा, बियाण्यांचा काळाबाजार होऊ नये यासाठी पथक नियुक्त करावे, प्रत्येक कृषी केंद्रानुसार कृषी सहायकांची नियुक्ती करावी व बियाणे वितरण सुरळीत पद्धतीने त्वरित सुरू करण्यात यावे या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनानंतर कृषी विभागाचे उपसंचालक श्री वाघमारे यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सर्व मागण्या मान्य करून तातडीने त्यानुसार कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे बियाणे वितरणासाठी लॉटरी सोडत उद्याच काढल्या जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे महाबीज सोयाबीन बियाणे वितरणातील अडचणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आंदोलनानंतर दूर होणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगराध्यक्ष करण दोड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मोहन शेळके, हर्षल ठाकरे, किरण ठाकरे, अनुप उंबरे, महेश घनगाव, सरपंच महेश मोरे, सचिन बोनगिरे, ऋषी पडोळे, बाळासाहेब तायडे, ज्ञानेश्वर ताले, कृष्णा बोंबटकार, दत्ता पांढरे, अमोल शिरसागर, श्रीकांत साबळे, किशोर राजूरकर, बंटी कुचर यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.


