अकोला,दि.७(जिमाका)- जिल्ह्यात पूर व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे पूर्ण झाले असून सानुग्रह अनुदान वितरण बऱ्यापैकी झाले असले तरी ज्यांच्या घरकुलांचे नुकसान झाले आहे ती घरे विविध घरकुल योजनांच्या माध्यमातून पुन्हा उभारता यावे यासाठी मदतीचा प्रस्ताव लवकर तयार करावा,असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले. यावेळी त्यांनी ज्यांचे घर, शेती, जिवितहानी तसेच पशुधनाची हानी असे अनेक प्रकारे नुकसान झाले आहे, अशा बाधितांची वेगळी नोंद करावी, तसेच जिल्ह्यात पूरव्यवस्थापनाचा आराखडा तयार करावा,असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे झालेले नुकसान व त्यानंतरचे मदत व बचाव कार्य याबाबतचा आढावा आज ना. कडू यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आ. नितीन देशमुख, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, कृषी विभागाचे अधिकारी तसेच सर्व तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते.
यावेळी माहिती देण्यात आली की, दि.२१ ते २४ जुलै दरम्यान झालेली अतिवृष्टी व त्यामुळे निर्माण पूरस्थितीमुळे जिल्ह्यात तीन शहरे व ६६६ गावे बाधीत झाली आहेत. तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. ७ हजार ३१९ हेक्टर शेतजमीनीचे नुकसान झाले तर ७५ हजार ७६८ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यात नुकसान झालेल्या घरांच्या मदतीसाठी आठ कोटी ५६ लक्ष ६ हजार २०० रुपयांच्या निधीचा मागणी प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. मृत झालेल्या तीन व्यक्तींच्या कुटूंबियांना १२ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान वितरीत झाले आहे. सानुग्रह अनुदानासाठी ९ हजार ५५९ घरांसाठी चार कोटी ७७लक्ष ९५ हजार रुपयांचे देयक कोषागारात सादर असून आतापर्यंत ९३५० घरांना चार कोटी ६७ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान वितरीत झाले आहे. जिल्ह्यात २९ मोठी दुधाळ जनावरे, ३२० लहान दुधाळ जनावरे, सात ओढकाम करणारी जनावरे तर २६७ कुक्कुट पक्षी मृत झाले आहेत. मृत जनावरांच्या मालकांना नुकसान भरपाई देण्यासाठी १९ लाख ६१ हजार २०० रुपयांच्या निधीचा मागणी प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे.
यावेळी पालकमंत्री म्हणाले की, ज्या ज्या लोकांनी पंचनामे व सर्व्हेक्षणाबाबत तक्रारी केल्या आहेत त्यांचे तातडीने सर्व्हेक्षण करा. पात्र लाभार्थ्याला मदतीपासून वंचित ठेवू नका. घरकुल दुरुस्ती वा पुनर्बांधणीसाठी १५ दिवसांत प्रस्ताव अहवाल द्या. जलसंपदा विभागाने जिल्ह्यातील पुरग्रस्त भागात यापुढे पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नाले व नद्यांचे खोलीकरण करणे तसेच पूर व्यवस्थापन, अन्य डागडुजीची कामे याबाबतही आराखडा तयार करावा,असे निर्देश दिले. तसेच ज्यांचे घर, शेती, जनावरे, पिके असे एकापेक्षा अधिक बाबींचे नुकसान झाले असेल त्यांची वेगळी नोंद करावी, अशीही सुचना त्यांनी केली.
मृतांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान
मोर्णा नदीच्या पूरात वाहून गेलेल्या सैय्यद अजगर हयात अली (वय ६०) व निकेतन हनुमंत वानखडे (वय २७) यांच्या परिवारास सानुग्रह अनुदान धनादेश वाटप ही बैठकीपूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. गेलेला व्यक्ती हा परत येऊ शकत नाही मात्र आर्थिक मदत ही कुटुंबाला हातभार देऊ शकते, म्हणून हा मदतीचा लहानसा प्रयत्न आहे. याशिवाय अन्य मदत योजनांमधून कुटुंबियांना मदत देण्यासाठी प्रयत्न करुन असे ना. कडू यांनी यावेळी सांगितले.