मनीष ढाले ग्रामीण प्रतिनिधी फुलसावंगी
प्रत्येक गाव, तांडा, वाडी वरील नागरीकांना पिण्याचे पाणी मिळालेच पाहिजे अशी तंबी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी अधिकाऱ्यांना दिली खरी पण कोट्यवधी रुपयांच्या जलजिवनच्या कामात झालेल्या गैर व्यवहारामुळे नागरिकांना पाणीच मिळणे दुरापास्त झाले असल्याने त्यांना पाणी मिळणार हे मृगजळ ठरू नये अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.उन्हाळ्याच्या पार्श्वभुमीवर महागाव तालुक्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.यामध्ये नाईक यांनी तालुक्यातील प्रत्येक गाव,वाडी,वस्ती,तांडा मधील नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी मुबलक प्रमाणात मिळालेच पाहिजे अशी तंबीच प्रशासनातील अधिकारी,कर्मचारी यांना दिली.परंतु त्यांनी तालुक्यात काही ठिकाणी काम सुरू असलेल्या तसेच काम पुर्ण झालेल्या जलजिवन मिशनच्या कामाबद्दल जाणुन घेणे अपेक्षित होते.कारण तालुक्यातील जलजीवन मिशनच्या कामामध्ये पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व कंत्राटदार यांनी मिलीभगत करून अंदाजपत्रकाला तिलांजली देत अत्यंत निकृष्ट व सुमार दर्जाचे काम करून शासनाचा निधी आपल्या घशात उतरविण्याचे काम केले हे.तर अनेक कामावर मोजमाप पुस्तिके मध्ये ज्यादा काम दाखवुन ज्यादा रक्कम कंत्राटदारांना अदा करण्यात आले असल्याचे कारनामे उघडकीस आले आहे. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना मुबलक पाणी मिळेल अशी आशा असतांनाच अधिकारी व कंत्राटदारांच्या मधुर संबंधांमुळे ही योजना केवळ शासनाच्या निधीचा मलिदा लाटण्याचे साधन बनली आल्याने नागरिकांना अजूनही पाण्याची प्रतीक्षा आहे.त्यामुळे मंत्री महोदयांनी नागरिकांना पाणी तर मिळालेच पाहिजे पण या योजनेची सखोल चौकशी करून शासनाचा निधी हडप करणाऱ्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी,कर्मचारी व कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.


