त्रिफुल ढेवले
तालुका प्रतिनिधि मोर्शी
मोर्शी : दररोजच्या दैनंदिन कामकाजातून आपले स्वतःचे छंद जोपासता यावे व विरंगुळा मिळावा, या उद्देशाने अशा प्रकारच्या स्पर्धा दरवर्षी नियमितपणे होणे अपेक्षित असून अशा स्पर्धा झाल्यास कर्मचाऱ्यांमध्ये एकजुटीची भावना वाढण्यास मदत होईल होते, असे मत मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांनी व्यक्त केले. मनपातर्फे आयोजित कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धांच्या बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. स्थानिक अभियंता भवन येथे आयोजित या बक्षीस वितरण समारंभात क्रीडा महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी करत विजेता, उपविजेता ठरलेल्या कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. कार्यक्रमाला मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त नरेंद्र वानखडे, डॉ. मेघना वासनकर, योगेश पिठे, मुख्य लेखापरीक्षक श्यामसुंदर देव, मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय फिस्के, सहायक आयुक्त नंदकिशोर तिखिले, दीप्ती गायकवाड, कार्यकारी अभियंता रवींद्र पवार, सिस्टिम मॅनेजर अमित डेंगरे, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, कार्यशाळा उपअभियंता लक्ष्मण पावडे, लेखा विभाग अधीक्षक प्रवीण इंगोले, सामान्य प्रशासन विभाग अधीक्षक नंदू पवार, बाजार परवाना अधीक्षक उदय चव्हाण, अजय विंचुरकर, राजेश आगरकर, आनंद जोशी, शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, शाळा निरीक्षक योगेश पखाले, क्रीडा निरीक्षक प्रवीण ठाकरे, सहायक कार्यक्रमाधिकारी पंकज सपकाळ, ज्योती बनसोड उपस्थित होते.
स्पर्धेदरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर क्रिकेटचे सामने भरवण्यात आले होते. यामध्ये एकूण ९ संघांनी सहभाग नोंदवला होता तसेच व्हॉलीबॉलचे सामने हे अंबापेठ स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर आयोजित केले होते. त्यामध्ये एकूण ५ संघांनी सहभाग नोंदवला होता. कार्यक्रम प्रसंगी सर्व खेळ प्रकारातील विजेते, उपविजेत्या चमू तसेच दोन महिने आधी मोर्शी येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय नगर परिषद व महापालिका कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचारी खेळाडूंसह शिक्षकांचा या वेळी स्मृतिचिन्ह व पदक देऊन आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमादरम्यान अमरावती शहरातील सुकन्या भारती फुलमाळीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून तसेच नुकतेच पार पडलेल्या वुमेन्स प्रीमियम लीगमध्ये गुजरात जायंट्स संघाकडून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मनपा आयुक्तांच्या हस्ते तिचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली ठाकरे व प्रियंका हंबर्डे यांनी केले. या प्रसंगी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाकरिता प्रल्हाद कोतवाल, डॉ. प्रकाश मेश्राम, योगेश पखाले, प्रवीण ठाकरे, अमित झरकर, पंकज सपकाळ, कैलास कुलट, अश्विन पवार, प्रतीक बोरकर आदींनी प्रयत्न केले.क्रिकेट स्पर्धेचा निकाल आणि विजेते: क्रिकेट स्पर्धेत झोन क्र. ३ दस्तुरनगरने विजेतेपद पटकावले, तर लेखा व ऑडिट विभाग उपविजेता पदाचा मानकरी ठरला. त्याचप्रमाणे महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत मनपा शिक्षिकांच्या संघाने जेतेपद, तर आरोग्य विभागाच्या महिला संघाने उपविजेतेपद पटकावले.


