देवलाल आकोदे
तालुका प्रतिनिधी भोकरदन
राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.शालेय शिक्षण मंत्री ना.श्री.दादा भुसे यांनी विधानसभेत ही घोषणा केली.या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.आधुनिक शिक्षण प्रणालीशी सुसंगत अभ्यासक्रमामुळे त्यांना स्पर्धात्मक परीक्षांची अधिक चांगली तयारी करता येईल.तसेच,नीट,जी,युपीएससी यांसारख्या राष्ट्रीय परीक्षांसाठी सुरुवातीपासून योग्य दिशा मिळेल.मराठीतूनही सीबीएसई अभ्यासक्रमाची पुस्तके उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात येणार आहे.हा बदल महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात नवी क्रांती घडवेल, असा विश्वास आहे. मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि शालेय शिक्षण मंत्री ना.श्री.दादा भुसे यांनी घेतलेल्या या दूरदृष्टीपूर्ण निर्णयाबद्दल भोकरदन-जाफराबाद चे आमदार तथा पीआरसी चेअरमन महाराष्ट्र राज्याचे माननीय संतोष भाऊ दानवे,बदनापूर-अंबडचे आमदार तथा अनुसूचित जाती कल्याण समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माननीय नारायण भाऊ कुचे यांच्यासह सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन, स्वागत व कौतुक होत आहे.


