त्रिफुल ढेवले
तालुका प्रतिनिधि मोर्शी
मोर्शी : मोर्शी तालुक्यातील चारघळ प्रकल्पग्रस्तांनी बुधवारी जलसंपदा कार्यालयावर धडक दिली. विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त समितीचे मनोज तायडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.प्रकल्पग्रस्तांनी खोपडा गावातील बाधित कुटुंबांना ८ लाख रुपयांचे पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे. यापूर्वीचे फेरमूल्यांकन स्थगित करण्याची मागणीही करण्यात आली. या संदर्भात गावात विशेष ग्रामसभा घेऊन ठराव पारित करण्याचे निश्चित झाले.निम्न चारघळ प्रकल्पाची सुरुवात २००६-०७ मध्ये झाली. या प्रकल्पांतर्गत बोडणा, खोपडा, लाडकी आणि उतखेड या चार गावांतील ३०० हेक्टर सुपीक जमीन संपादित करण्यात आली. त्यापैकी ९० टक्के जमीन सरळ खरेदी पद्धतीने अत्यंत कमी दराने खरेदी करण्यात आली. प्रकल्पग्रस्तांनी धरणाची घळभरणी रोखण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनात सरपंच किरणताई भोकरे, विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे तालुकाध्यक्ष नयन लुंगे, भाजपचे पदाधिकारी सचिन लुंगे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.


