महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.१२:- भद्रावती तालुक्यातील आष्टा मुधोली विभागातील वैयक्तिक वन हक्क धारकांनी केलेल्या वनहक्कदाव्याची प्रमाणित प्रत मिळण्यासाठी वरोडा येथील उपविभागीय कार्यालयात जाऊन माहितीच्या अधिकारात अर्ज दाखल केल्यामुळे प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी ( वनहक्क मान्य करणे ) अधिनियम २००६ व नियम २००८ आणि सुधारणा नियम २०१२ नुसार भद्रावती तालुक्यातील घोसरी, कोकेवाडा ( तुकूम ) किन्हाळा, सोनेगाव, काटवल ( तु. ), मुधोली व खुटवंडा येथील वनहक्क धारकांनी वयक्तिक वनहक्क दावे तयार करून उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष उपविभागीय स्तरीय वनहक्क समिती वरोडा यांच्या कार्यालयात सादर केले होते. परंतु ऑक्टोबर २०२४ मध्ये उपविभागीय स्तरीय वन हक्क समिती वरोडा यांनी ६० दावे अमान्य केले आणि उर्वरित दावे प्रलंबित ठेवले. ज्या वनहक्कधारकांचे वनहक्क दावे नामंजूर करण्यात आले. त्या वनहक्कधारकांनी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय वन हक्क समिती चंद्रपूर यांच्याकडे अपील दाखल केले. त्या अपिला संदर्भात कागदपत्र सादर करण्यासाठी वनहक्क धारकांकडे दाव्याची कसल्याही पद्धतीचे कागदपत्र नसल्यामुळे एकूण ४७ वनहक्क धारकांनी त्या दाव्यांच्या प्रमाणित सत्यप्रत मिळण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय वरोडा यांना माहितीच्या अधिकारात अर्ज दाखल केले. याबाबतची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया सामाजिक कार्यकर्ते माधव जीवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण मित्रचे शंकर भरडे, भानुदास पेंदाम, रवीकुमार जांभुळे व ममता श्रीरामे सहकार्य करीत आहे.


