त्रिफुल ढेवले ग्रामीण प्रतिनिधि मोर्शी
मोर्शी : मोर्शी तालुक्यासह जिल्ह्यात नावलौकिक असलेल्या नेरपिंगळाई येथील श्री समर्थ गुलाबपुरी महाराजांचा १०१ वा पुण्यतिथी महोत्सव ५ मार्चपासून भक्तिमय वातावरणात सुरू आहे. यंदा या सोहळ्याचे १०१ वे वर्ष होते. या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी दुपारी २ वाजता पालखीतून श्रींच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. या वेळी संपूर्ण नेरपिंगळाई गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.या सात दिवसांच्या कार्यक्रमात संगीतमय भागवताचा भाविकांनी मनसोक्त आनंद घेतला. सातही दिवस अन्नदान कार्यक्रम आयोजित केला होता . या अन्नदान सोहळ्यात सर्व भक्तांनी सेवा दिली. सप्ताह समाप्तीच्या निमित्ताने ग्रंथ पूजन व ग्रंथ दिंडीचे आयोजन केले होते. या ग्रंथ दिंडी सोहळ्यात टाळ-मृदंगाच्या तसेच ज्ञानोबा माऊली नामाच्या गजरात गावातील सर्व धर्मीय महिला भजन मंडळ, तरुण मंडळ, आबालवृद्ध असे सर्वच मोठ्या उत्साहाने नाचण्यात दंग झाले होते. कामानिमित्त बाहेरगावी राहणारे नेरपिंगळाईकर तसेच माहेरवाशीण महिला सप्ताह सोहळ्याला उपस्थित होत्या. गावातील सर्व महिलांनी आपापल्या अंगणात आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. या पालखी सोहळ्यात सर्व भाविक हरिनामाच्या गजरात दंग होऊन गेले होते. शेकडो दिंड्या व हजारो महिला व पुरुष या ऐतिहासिक मिरवणुकीत सहभागी झाले होते. ग्रंथ दिंडीच्या निमित्ताने गावातील तरुण कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी अल्पोपाहार व जलपानाची व्यवस्था केली होती. ११ मार्चला सर्व भाविक भक्तांसाठी पुरणपोळीचा महाप्रसाद आयोजित केला होता. या महाप्रसादाचा हजारो भक्तांनी सहकार्य करून लाभ घेतल्याची माहिती विश्वस्त मंडळाने दिली.डोळ्याचे पारणे फेडणारी शिस्तबद्ध मिरवणूक मिरवणुकीदरम्यान लहान मुलांनी केलेली संत ज्ञानेश्वर महाराज, विठ्ठल-रुक्मिणी, रामभक्त हनुमान, वासुदेव, राधा कृष्ण यांची वेशभूषा आकर्षणाचे केंद्र होते. महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन फेर धरत देखणे नृत्य केले. अतिशय शिस्तबद्ध मिरवणूक डोळ्याचे पारणे फेडणारी ठरली. टाळ, मृदंगांच्या गजराने नेरपिंगळाई गाव दुमदुमले होते.


