त्रिफुल ढेवले
ग्रामीण प्रतिनिधि मोर्शी
मोर्शी : एका आश्रमात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाला. ही धक्कादायक घटना दि. 21 उघडकीस आली. याप्रकरणात पोलिसांनी प्रथम रिद्धपूर येथील मठाचे प्रमुख सुरेंद्रमुनी तळेगावकर, बाळकृष्ण देसाईसह पीडित मुलीच्या मावशीला अटक केली होती. दरम्यान, या प्रकरणातील चौथा आरोपी हा पीडितेचा मामा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याला दि. 23 रविवारी अटक केली.अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथील सुरेंद्रमुनी तळेगावकर महाराजाच्या मठात सेवेकरी असणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर आरोपींनी अत्याचार केला. आरोपी मागील वर्षभरापासून पीडितेवर तळघरात अत्याचार करत होते. यात मुलीच्या मावशीने आरोपींना सहकार्य केले. पीडितेला 8 महिन्यांची गर्भधारणा झाल्याने हा प्रकार उघडकीस आला होता.घटनेची माहिती मिळताच अल्पवयीन तरुणीच्या आई-वडिलांनी शिरखेड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणात सुरेंद्र मुनी आणि बाळकृष्ण देसाई या दोघांना अटक केली आहे. तरुणीच्या मावशीला देखील ताब्यात घेतले आहे. चौकशीअंती मुलीच्या सख्ख्या मामाने देखील तिचे शोषण केल्याचे निष्पन्न झाले आहे.पोलिसांनी अत्याचारप्रकरणी आरोपींवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी सांगितले आहे. मठामध्ये झालेल्या धक्कादायक प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी अत्याचार केला. त्यामुळे ती गर्भवती राहिली. पीडित मुलीच्या पोटातील बाळ हे कुणाचे आहे हे शोधण्यासाठी मुलीच्या प्रसूतीनंतर तिच्या बाळाची डीएनए तपासणी केली जाणार आहे.पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी मुलगी गर्भवती असताना देखील पोलिसांना माहिती दिली नव्हती. त्यामुळे डॉक्टरही पोलिसांच्या चौकशीच्या घेऱ्यात येणार आहे. यासंदर्भात पोलिस त्या संबंधित डॉक्टरांची चौकशी करणार आहे.1 जानेवारी 2024 पासून एक 17 वर्षीय मुलगी व तिची मावशी तसेच मामासह सुरेंद्र मुनी तळेगावकर यांच्या मठात सेवा करण्यासाठी राहत होती. ती मूळची नागपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. मुलगी मठात आल्यानंतर काही दिवसांनी मठप्रमुख सुरेंद्र मुनी तळेगावकर याने तिच्या मावशीच्या माध्यमातून 2 एप्रिलला तिला खोलीत बोलावून तिच्याशी जबरीने अत्याचार केला.तसेच मठातील आणखी एक व्यक्ती बाळासाहेब देसाई 40, रा. रिध्दपूर यानेही तिच्यावर अत्याचार केला. ही बाब मुलीने तिच्या मावशीला सांगितली; मात्र तिने धमकी देऊन चूप राहण्यास सांगितले. नेहमी अत्याचार होत असल्यामुळे त्रस्त होऊन पीडित मुलीने या घटनेची तक्रार शिरखेड पोलिसांत दाखल केली होती. पोलिसांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता तिला 8 महिन्यांची गर्भधारणा झाल्याचे तपासणीत आढळून आले.


