भरत पुंजारा ग्रामीण प्रतिनिधी, पालघर
कासा येथे ७, ८ व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी “कासा महोत्सव २०२५” मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कासा येथील पुज्य आचार्य भिसे शाळेच्या प्रांगणात आयोजित या महोत्सवात राजकीय, सामाजिक कार्यकर्ते आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद लुटला.महोत्सवाचे उद्घाटन पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे, माजी आमदार श्रीनिवास वनगा, तहसीलदार सुनिल कोळी, शिवसेना डहाणू तालुका प्रमुख संतोष देशमुख, आनंद ठाकुर, सरपंच सुनिता कामडी, तसेच कासा पोलिस अविनाश मांदळे, मनिषा निमकर, अप्पा भोये, धनंजय वनमाळी, हरेश मुकणे, शैलेश घारपुरे, पांडुरंग बेलकर आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.या महोत्सवात ६५ स्टॉल्स उभारण्यात आले होते, ज्यामध्ये खाद्यपदार्थ, भेटवस्तू, कपडे आणि विविध वस्तूंची दुकाने होती. नागरिकांनी या स्टॉल्सला भरभरून प्रतिसाद दिला आणि मोठ्या प्रमाणात खरेदी केली.तिन्ही दिवस महोत्सवात विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यूट्यूब कलाकारांनी आपल्या कलेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले, तर सुप्रसिद्ध गायक दादुस, जगदीश पाटील आणि इतर कलाकारांनी आपल्या सुरेल सादरीकरणाने उपस्थित नागरिकांचे भरपूर मनोरंजन केले.यंदाच्या पहिल्याच “कासा महोत्सव २०२५” ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीन दिवस चाललेल्या या उत्सवाने व्यवसायिक, कलाकार आणि नागरिकांना एकत्र आणत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले. भविष्यात हा महोत्सव अधिक मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

