बद्रीनारायण गलंडे जिल्हा प्रतिनिधी हिंगोली
हिंगोली,: हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त वाढीव निधी देण्यात येणार असून, जिल्ह्यात होणाऱ्या दर्जात्मक विकासकामावर भर देण्याचे निर्देश वित्त व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनातून दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यस्तरीय प्रारुप आराखडा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.या बैठकीस मंत्रालयातून अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ, आर् आणि नियोजन राज्यमंत्री ॲङ आशिष जयस्वाल, आमदार राजू नवघरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, जिल्ह्याच्या पालकसचिव रिचा बागला, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता उपस्थित होते.जिल्हा वार्षिक योजना 2025-26 या आर्थिक वर्षासाठी सर्वसाधारण वार्षिक योजनेतर्गंत प्रत्यक्ष 186 कोटी 59 लाख रुपयांचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली आहे. आज आयोजित राज्यस्तरीय प्रारुप आराखडा बैठकीत जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी 571 कोटी 91 लाख 18 हजार रुपयांची अतिरिक्त मागणी केली आहे. त्यामुळे आता जिल्ह्याचा वार्षिक योजनेचा (सर्वसाधारण) आराखडा 758 कोटी 50 लाख 18 हजार रुपये करण्याची मागणी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केली. दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार सर्वश्री तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्ह्याची सकारात्मक जीडीपी वाढ ही आनंदाची बाब असून, खात्यावर असलेला उपलब्ध निधी त्वरित खर्च करावा. सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून सरकारचा पैसा योग्य ठिकाणी, दर्जेदार कामे होण्यासाठी खर्च करावा. तसेच जिल्हा वार्षिक योजनेचा चालू वर्षाचा शंभर टक्के निधी खर्च करावा. हिंगोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ, लोकसंख्या, निती आयोगाने आकांक्षित जिल्हे व तालुके या सर्व बाबींचा विचार करुन जास्तीत जास्त निधी देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.राज्यस्तरीय आयोजित ऑनलाईन बैठकीत वित्त व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर्षीचा राहिलेला निधी वेळेत खर्च करावा. कोणताही निधी व्यपगत होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विनंतीनुसार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन आराखडा अंतिम करण्यापूर्वी जास्तीचा वाढीव निधी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही यावेळी सांगितले.यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी हिंगोली जिल्ह्यातील रस्ते, ग्रामीण रुग्णालय, आरोग्य केंद्रे, प्रशासकीय इमारती, श्री. संत नर्सी नामदेव व औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकास तसेच जिल्ह्याचा पायाभूत व मूलभूत विकास करण्यासाठी जास्तीत जास्त वाढीव निधी देण्याची मागणी केली. जिल्हा विकास आराखड्यातील कामासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या निधीचा वापर करावा व निधी कमी पडत असल्यास जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वापरावा. सन 2023-24 चा अखर्चित निधी व चालू वर्षाचा निधी मार्च अखेरपर्यंत पूर्णपणे खर्च करावा, अशा सूचनाउपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारुप आराखड्याची सविस्तर माहिती सादर केली. नाला खोलीकरण, सीएनबीची कामे, पशुसंवर्धनासाठी औषधी व अत्याधुनिक साहित्य सामुग्री खरेदी करणे, येलदरी, औंढा नागनाथ व वारंगा फाटा या वनपर्यटन स्थळांचा विकास करणे, वनसंरक्षण व मृद जलसंधारणची कामे करणे, घनवन विकसित करणे, ग्रामीण भागातील स्मशानभूमी शेड, आठवडी बाजार विकसित करणे, भूमिगत गटार, अभ्यास केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम, जिल्ह्यातील 33 पाझर तलावांची दुरुस्ती, 12 कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती, 18 नवीन सिमेंट बंधारे बांधकाम करणे, जिल्हा परिषद शाळांच्या इमारतीचे बांधकाम, वर्गखोल्यांची दुरुस्ती, शाळेत शौचालय बांधणे, क्रीडांगण विकास, क्रीडा साहित्य पुरवठा, नवीन वैद्यकीय महाविद्यालयासाठी अत्याधुनिक यंत्र व साधनसामुग्री खरेदी, नवीन 3 प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम, अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृह, अंगणवाडी बांधकाम, स्वयंपाकघराचे आधुनिकीकरण, अंगणवाडी दुरुस्ती, महिला व बालविकास भवन बांधकाम, महिला बचत गटाकरिता विक्री केंद्र उभारणे, नागरी भागातील रस्ते, भूमिगत गटारे, स्मशानभूमी, उद्याने विकसित करणे, जिल्ह्यातील नवीन रस्ते व पुलाचे बांधकाम, औंढा नागनाथ, नर्सी नामदेव व सिध्देश्वर पर्यटन स्थळांसह 16 पर्यटन स्थळांचा विकास करणे, जिल्ह्यातील विविध यात्रास्थळांच्या ठिकाणी भौतिक सोयीसुविधा निर्माण करणे आदी जिल्ह्यातील विविध विकास कामासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी यावेळी सांगितले.यावेळी हिंगोली जिल्ह्यातील विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

