त्रिफुल ढेवले
ग्रामीण प्रतिनिधि मोर्शी,
मोर्शी : मागील २ महिन्यांपासून अस्थायी स्वरूपात काम करणाऱ्या सफाई कामगारांचे देयक कंत्राटदाराने दिले नसल्याने ३५ कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. कंत्राटदाराकडून थकीत रक्कम मिळेपर्यंत काम बंद राहणार आहे, अशी भूमिका या सफाई कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.मोर्शी शहरातील रस्त्यावर असलेला कचरा उचलून तो ट्रॅक्टरद्वारे गावाबाहेर नेणे, नाल्या स्वच्छ करणे तसेच घराघरातील कचरा गाडीद्वारे कचरा डेपोमध्ये नेऊन टाकणे यासाठी अस्थायी स्वरूपातील कर्मचारी दोन महिन्यापूर्वी लावण्यात आलेले होते. या कर्मचाऱ्यांना पंधरा दिवसाच्या वेतनाची रक्कम त्यांना देण्यात येईल, असा करार त्यांच्यात केला गेला असल्याचे या सफाई कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु, मागील दोन महिन्यांपासून त्यांना कोणत्याही प्रकारची रक्कम देण्यात आली नसल्याने या कर्मचाऱ्यांनी रविवारपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे.विशेष म्हणजे या मनुष्यबळ पुरवठा ठेक्यात काम करणाऱ्या गरीब मजुरांना फक्त ३०० रुपये मजुरी दिली जाणार असल्याचे व ५० रु. भविष्य निधीसाठी कपात करण्यात येणार असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र मागील २ महिन्यांपासून कंत्राटदाराने पगार न दिल्याने या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले आहे.अस्थायी स्वरूपात काम करणारे या सफाई कर्मचाऱ्यांची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे व त्यांच्याकडे उत्पन्नाचे दुसरे कोणतीही साधन नसल्यामुळे त्यांना वेळेवर वेतन मिळणे गरजेचे आहे. परंतु, कंत्राटदाराने दोन महिन्यांपासून त्यांना वेतन न दिल्याने व त्यांची या वेतनावरच भिस्त असल्याने त्यांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.