भरत पुंजारा
ग्रामीण प्रतिनिधी पालघर
बऱ्हाणपुर:- पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. केंद्र सरकारच्या जलजीवन योजनेअंतर्गत प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट होते, परंतु बहुतांश ठिकाणी ही कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत.
जिल्ह्यात धामणी, कवडास, साखरे आणि इतर अनेक लहान-मोठी धरणे अस्तित्वात असूनही स्थानिक नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या धरणांचे पाणी वसई-विरार आणि बोईसर औद्योगिक क्षेत्रात वळवले जात असल्याने गावांमध्ये पाणीटंचाई अधिकच तीव्र झाली
आहे.यावर्षी सुरू असलेल्या पाटबंधारे विभागाच्या कामांमुळे बऱ्हाणपूर, तवा, सोमटा, आंबेदे, आकोली, नानिवली यांसारख्या अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. बऱ्हाणपूर पाटीलपाडा येथे केवळ एक-दोन दिवसांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, मात्र तो पुरेसा ठरत नाही.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या असून, जलजीवन योजनेची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. तसेच, ज्या गावांमध्ये पाणीटंचाई आहे, त्या ठिकाणी पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी होत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.