एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर भार;अनेक कर्मचाऱ्यांची पदे रिक्त
सिध्दार्थ कांबळे
ग्रामीण प्रतिनिधी बिलोली
कुंडलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदामुळे उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यावर अनेक विभागाचा अतिरिक्त कामाचा भार येत असल्याने वेळेवर आरोग्य सुविधा मिळण्यास अडचणी निर्माण होत असून दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी एकच वैद्यकीय अधिकारी सध्या कार्यरत असून एक वैद्यकीय अधिकारी पदासह अनेक कर्मचाऱ्यांची पदे ही रिक्त असल्याने कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर असून आरोग्य केंद्र असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था आरोग्य केंद्राची झाली आहे. याकडे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी हे सर्वात मोठे गाव असून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कुंडलवाडी शहर तसेच माचनूर,हुनगुंदा,आरळी,अर्जापूर, पिंपळगाव(कुं) या ५ उपकेंद्रांचा समावेश होतो.या आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या २४ गावांतील ३२ हजार व कुंडलवाडी शहरातील जवळपास १६ हजार रुग्णांच्या आरोग्य सेवेचा भार या केंद्रावर अवलंबून आहे. आहे. कुंडलवाडी शहर हि मोठी बाजारपेठ असून आठवड्यात मंगळवार व शुक्रवार दोन दिवस बाजार भरतो.या आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांची संख्या ही मोठी आहे.परंतु या आरोग्य केंद्र व उपकेंद्रात मंजूर २९ पदांपैकी एका वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ९ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यावर अतिरिक्त ताण पडत येत आहे. एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहे.त्यामुळे रुग्णांना वेळेवर सेवा मिळण्यास अडचणी निर्माण होत असून रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड व गैरसोय होत आहे.सध्या वातावरणातील बदलामुळे सर्दी,खोकला,ताप,विषमज्वर आदी आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आरोग्य केंद्रात येत आहेत्. दररोज २०० ते २५० ओपीडी रुग्णांची संख्या आहे. एकच महिला वैद्यकीय अधिकारी कार्ररत असून प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सुरू असून आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी हे उपकेंद्र सोडून प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देत असल्याने उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या पाचही गावातील नागरिकांना आरोग्य सेवा वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यातच एकच महिला वैद्यकीय अधिकारी असल्याने त्या शासकीय बैठका प्रशिक्षणासाठी गेल्यास रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.