शिवाजी पवळ
शहर प्रतिनिधी, श्रीगोंदा
तालुक्यातील अवैध धंद्याविरोधात नागरिकांनी पोलिस प्रशासनाविरोधात रविवारी (२६ जानेवारी) आंदोलन केले होते. त्याची दखल घेत पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाई करीत मागील दोन दिवसांत ३५ गुन्हे दाखल केले असून, आरोपींकडून ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अनेक दिवसापासून तालुक्यात राजरोस सुरू असलेले अवैध धंदे पोलिसांच्या रडारवर आले आल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे.
श्रीगोंदे फॅक्टरी, चांडगाव, टाकळी लोणार, औटेवाडी, घोगरगाव, मांडवगण, तरडगव्हाण, काष्टी, श्रीगोंदे शहर, आढळगाव, निमगाव खलू, चिकलठणवाडी, वेळू, खांडगाव,
कणसेवाडीसह तालुक्यातील ग्रामीण भागात जाऊन पोलिसांनी अवैध धंद्यावर कारवाई करीत हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त अथवा नष्ट केला. श्रीगोदे परिसरात ऊसासह लिंबू, कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या भागात कामगारांना रोज नगद मजुरी मिळते. त्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध असल्याने व रोज पैसे मिळत असल्याने अवैध धंदे फोफावले होते. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. त्याविरोधात अनेक सामाजिक संघटना, राजकीय व्यक्तींनी हे अवैध धंदे बंद करण्यासाठी उपोषण केले होते. त्या अनुषंगाने श्रीगोंदे पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी किरण शिंदे व कर्मचाऱ्यांनी अवैध धंदे बंद करण्याचा निर्णय घेऊन सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे.