त्रिफुल ढेवले
ग्रामीण प्रतिनिधि मोर्शी,
मोर्शी : मोर्शी तालुक्यातील महावितरण उपविभागातील थेट हूक टाकून वीजचोरी करणे, मीटरमध्ये फेरफार करून मीटर संथ करणे, रिमोट कंट्रोलने वीजचोरी करून स्मार्ट समजणाऱ्या ४२ वीज चोरांवर वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. त्यात तब्बल ४२ ग्राहकांवर ८ लाख ६८ हजारांची दंडात्मक कारवाई केली.अनेक नागरिक घरातील मीटर संथ करणे, मीटरमध्ये छेडछाड करणे यासारख्या वीज चोरीच्या उपाययोजना करीत आहेत. त्यामुळे अनेक ग्राहकांना कमी वीज बिल येत आहे. विजेचा वापर केल्यानंतरही मोठे देयक टाळण्यासाठी वीजचोरांनी त्यांच्याकडील मीटरमध्ये फेरफार केली आहे. यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मीटरची तपासणी करण्यासाठी १२ पथके तयार केली. या पथकांनी मोर्शी परिक्षेत्रातील विविध ठिकाणी धाडी टाकून जास्त वीज वापर मात्र कमी वीजबिल येणाऱ्या वीज ग्राहकांच्या वीज चोऱ्या उघडकीस आणल्या आहेत.ही वीज चोरी रोखण्यासाठी मोर्शी परिसरात कार्यकारी अभियंता विजयकुमार कासट यांच्या मार्गदर्शनात अति. कार्यकारी अभियंता प्रशांत काकडे, उपकार्यकारी अभियंता आशिष सोरडे, हर्षल थोटे यांच्या नेतृत्वात वीजचोरी पकडण्यासाठी ही मोहीम राबवली.या मोहिमेत ८० कर्मचाऱ्यांची १२ पथके तयार करून मोर्शी शहर व तालुक्यात वीज चोरी पकडली. यात मोर्शी उपविभाग १ मध्ये ३० ग्राहकांकडून ७ लाख ११ हजार व मोर्शी उपविभाग २ मधून १२ ग्राहकां कडून १ लाख ५७ हजार अशी एकूण ८ लाख ६८ हजारांची वीज चोरी पकडली. या वीज चोरट्यानी ४३,८६३ युनिटची चोरी केल्याचे उघड झाले . त्याचवेळी २ ग्राहकांनी नियमबाह्य वीज कनेक्शन घेऊन २५० युनिटची चोरी केली होती. त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई केली.


