भरत पुंजारा
ग्रामीण प्रतिनिधी पालघर
तलासरी वेवजी (काटीलपाडा) येथील रहिवासी अशोक रमण धोडी (५४) गेल्या नऊ दिवसांपासून बेपत्ता आहेत. सोमवारी, २० जानेवारी रोजी ते डहाणू येथून खाजगी कारने घरी परतत असताना अचानक बेपत्ता झाले. त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कारबद्दल कोणतीही माहिती मिळाली नसून, कुटुंबीयांनी त्यांच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला आहे.
अशोक धोडी हे लाल रंगाच्या मारुती ब्रेझा (GJ-15, CP-2680) या कारने डहाणू येथे आले होते. त्यानंतर त्यांनी ट्रेनने मुंबईला प्रवास केला आणि सोमवारी संध्याकाळी डहाणू रेल्वे स्थानकात परतले. घरी जाण्यासाठी निघाल्यानंतर मात्र ते परतलेच नाहीत. त्यांच्या पत्नीने त्यांच्या अपहरणाची शक्यता व्यक्त केली असून, पोलिसांनी त्वरित तपास करावा, अशी मागणी केली
आहे.या घटनेच्या दिवशी वेवजी टेकडी येथील एका वळणावर कारच्या तुटलेल्या काचा आढळून आल्या आणि लाल रंगाची कार निर्जन रस्त्यावरून वेगाने गेली असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. घोलवड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, दोन्ही बाजूंनी शोध मोहीम राबवली जात आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असला तरी पुढील ठिकाणी कोणतेही फुटेज न मिळाल्याने चौकशीत अडथळे येत आहेत. संशयास्पद ठिकाणी तपास केला जात असून, स्थानिक ग्रामस्थांकडून माहिती घेतली जात आहे.
या घटनेमुळे धोडी कुटुंबीयांमध्ये प्रचंड तणाव असून, सात दिवस उलटूनही ठोस पुरावा न मिळाल्याने चिंता वाढली आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलून पोलिसांनी तपासाची गती वाढवावी आणि अशोक धोडी यांचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अशी मागणी कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.








