पवन ठाकरे
ग्रामीण प्रतिनिधी संग्रामपूर
संग्रामपूर: संग्रामपूर तालुक्यातील वानखेड गावांमध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या अमर महादेव अजने रा. निरोड,संग्रामपूर यांच्यावर वानखेड गावात शासकीय काम करत असताना दोन व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी प्रकाश नंदू तायडे आणि आकाश नंदू तायडे यांच्याविरुद्ध तामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अमर अजने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 28 जानेवारी वानखेड येथे वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आणि वसुलीसाठी गेले असता शिवशंकर डीपी जवळ प्रकाश तायडे यांनी त्यांना अडवून वीज बिलाबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांच्या नावाचा वीज बिल यादीत उल्लेख नसल्याचे सांगितल्यावर प्रकाश तायडे यांनी शिवीगाळ करत कॉलर पकडून खाली पाडले आणि पाठीत मारहाण केली.त्यानंतर त्याचा भाऊ आकाश तायडे यांनीही शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.यावेळी घटनास्थळी असलेल्या दिनेश टोपरे व सुनील इंगळे यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र,सरकारी कामात अडथळा आणल्याने व मारहाणीच्या घटनेनंतर अमर अजने यांनी तामगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 च्या कलम 132, 121(1), 352, 351(2), आणि 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तामगाव पोलीस करत आहेत.


