भरत पुंजारा
ग्रामीण प्रतिनिधी पालघर
डहाणू तालुक्यातील शासकीय तवा आश्रमशाळेने धामटणे गावात मोठ्या उत्साहात वनभोजनाचे आयोजन केले. शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
वनभोजनाचा प्रवास तवा आश्रमशाळेतून सुरू होऊन जवळपास ३ किमी अंतरावर असलेल्या धामटणे गावात संपन्न झाला. प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांनी गाणी गात, खेळत आणि निसर्गाचा आनंद घेत आपला प्रवास संस्मरणीय बनवला.
वनभोजन स्थळी पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा जागेची स्वच्छता करून सहकार्याची भावना जपली. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी भोजनाची तयारी करत स्वयंपाकात हातभार लावला, तर इतर विद्यार्थी विविध खेळ खेळून आनंद घेत होते. संपूर्ण वातावरण खेळ, हास्य आणि निसर्गाच्या सान्निध्यात रंगले
होते.या आगळ्या-वेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सान्निध्यात शिकण्याचा अनुभव मिळाला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य, स्वावलंबन, स्वच्छतेचे महत्त्व आणि निसर्गाशी जवळीक अशा विविध जीवनमूल्यांची रुजवात झाली.
हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी प्रेरणादायी ठरला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक केले आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन भविष्यातही करण्याची इच्छा व्यक्त केली.