निंबाळा येथील घटना
पोलिसांत गुन्हा दाखल
महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती,दि.३१:- पारंपारिक शेतीच्या वादातून सेवानिवृत्त सीमा सुरक्षा दलाच्या जवानास पत्नीसह मारहाण केल्याची घटना आज दि.३१ जुलै रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास भद्रावती तालुक्यातील निंबाळा या गावी घडली.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीमा सुरक्षा दलातून सेवानिवृत्त झालेले जवान अनिल संभाजी जीवतोडे(४३) हे नुकतेच मागील जून महिन्यात बाॅंड पूर्ण झाल्याने आपल्या निंबाळा या गावी परत आले. तेथे ते आपली वडिलोपार्जित शेती करु लागले. शेतीच्या वाटपावरुन त्यांचा त्यांच्या सख्या तीन भावांसोबत वाद सुरु आहे.आज दि.३१ जुलै रोजी सकाळी शेतात काम करीत असताना त्यांच्या पत्नीने त्यांना त्यांचे भाऊ त्यांच्या आई-वडिलांसोबत भांडण करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे अनिल शेतातून घरी जायला निघाले असता रस्त्यात नामदेव जीवतोडे, मीरा जीवतोडे, मयुर जीवतोडे व सुमीत जीवतोडे यांनी मिळून अनिल जीवतोडे यांना बेदम मारहाण केली. आपल्या पतीला वाचविण्यासाठी मध्ये आलेल्या अनिल यांच्या पत्नीलाही चपलेने मारहाण करण्यात आली.या घटनेची अनिल जीवतोडे यांनी भद्रावती पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी नामदेव जीवतोडे,मीरा जीवतोडे, मयुर जीवतोडे आणि सुमीत जीवतोडे यांच्या विरुद्ध भा.दं.वि. ३२४, ५०६, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.