मनोज गवई तालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे
चांदुर रेल्वे – महाराष्ट्र सरकार व लोकसहभागातून सुरू असलेल्या जलसाक्षरता अभियानाचे प्रशिक्षण 19 फेब्रुवारी 2024 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पावन पर्वावर संपन्न झाले. भारतीय जल फाउंडेशन व बहुउद्देशिय महिला विकास संस्था चांदुर रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण जि प माध्यमिक शाळेत घेण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन गट विकास अधिकारी संजयजी खारकर यांनी केले तर अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक गणेश चव्हाण हे होते . सर्वप्रथम शिवाजी महाराजांच्या फोटोचे पूजन मुख्याध्यापक चव्हाण सरांनी केले. तिवसा,धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर व चांदुर रेल्वे इत्यादी तालुक्यातील महिला मोठया संख्येने प्रशिक्षणार्थी म्हणून उपस्थित होत्या सहाय्यक शिक्षिका अर्चना सोळंके यांनी शिवकालीन पाण्याचे व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण दिले तर विस्तार अधिकारी रमेश मेश्राम यांनी जल जीवन मिशन या विषयावर प्रशिक्षण दिले. बार्टीचे समतादूत सलीमखान पठाण यांनी जलसाक्षरता व महिला या विषयावर प्रशिक्षणार्थी सोबत चर्चा करून मार्गदर्शन केले आणि अमरावती जिल्ह्याचे जलप्रेमी ऍड राजीव अंबापुरे यांनी पाण्याचा ताळेबंद या विषयावर प्रशिक्षण दिले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगिता कडू, प्रीती मोटघरे,पुष्पा घोंगडे,रजनी इंगोले इत्यादी नी प्रयत्न केले संचालन अर्चना अंबापुरे यांनी तर आभार प्रदर्शन अंजली गवई यांनी पार पाडले.