लक्ष्मीकांत राऊत,
शहर प्रतिनिधी ,परतूर
नगरसेवकांचा कार्यकाळ संपून पावणेदोन वर्ष होत आले तरी नगरपरिषद निवडणुक लागलेली नसल्याने भावी नगरसेवक वाट पाहून थकले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
नगरपरिषद निवडणुक आज होईल उद्या होईल अशी वाट पाहता पाहता पावणेदोन वर्षाचा काळ लोटला तरी नगरपरिषद निवडणुक लागली नसल्याने भावी नगरसेवक आता थकले असल्याचे दिसत आहेत.मागील नगरपरिषद निवडणुक नोहेंबर २०१६ मध्ये झालेली होती. नगरसेवकांचा कार्यकाळ डिसेंबर २०१६ ला संपला. त्यानंतर कोरोना कारण देत निवडणुका पुढे ढकलल्याने २८ डिसेंबर २०२१ पासून नगरपालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली. १८ ऑगस्ट २०२२ ला निवडणुक आयोगाने मतदानाची तारीख म्हणत ७ जुलै २०२२ ला नगरपरिषद निवडणुक जाहीर करून भावी नगरसेवकात चैतन्य निर्माण केले आणि नऊ महिन्यानंतर ही मंडळी जनतेच्या संपर्क कामाला उत्साहात कामाला लागली खरी पण लगोलग १४ जुलै रोजी निवडणुक आयोगाने परत निवडणुक रद्द केल्याने जनतेच्या सेवेला लागलेल्या या मंडळींचा भ्रमनिरास झाला. आता यालाही एक वर्षाचा काळ लोटला पण निवडणुक कधी होणार हे आजही समजायला तयार नाही त्यामुळे ही भावी नगरसेवक मंडळी सध्या अस्वस्थ आहे.
परतूर शहरातील मागील व आत्ताच्या राजकारणात उलटफेर झाल्याचे आढळून येत आहे. मागच्या सभागृहात काँग्रेस व मित्र पक्षाचे २० नगरसेवका पैकी १० नगरसेवक होते तर भाजपा व मित्र पक्षाचे १० नगरसेवक होते.तर नगराध्यक्ष पद काँग्रेसकडे होते. आता राजकारणात उलटफेर झाल्याचे दिसत आहे , काँग्रेस मधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र निवडणुक लढवण्याची तयारी करत आहे.तर भाजपा शिवसेना युतीतून ठाकरे शिवसेना बाहेर असणार आहे. गेल्या पाच वर्षांत नगरपालिका काँग्रेस कडे असली तरी शहरातील महत्वाची विकासकामे भाजपा ने केलेली असल्याने येणारी निवडणुकीत उत्सुकता ताणली जाणार आहे पण निवडणुक केव्हा ? या प्रश्नाने सारेच थंड झालेले आहेत.
–











