सतीश पाचपुते
तालुका प्रतिनिधी अकोले
अकोले– येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भंडारदरा व द-याचीवाडी तसेच ग्रामपंचायत भंडारदरा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी वीर राघोजी भांगरे स्मारकापर्यंत विविध आदिवासी सांस्कृतिक वेशभुषेत विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. संयोजन समितीकडून आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे व वीर गोविंदराव खाडे स्मारकाजवळ सामुदायिक “फडकी ध्वजपताका” फडकाउन सामुदायिक पंचप्रण शपथ घेण्यात आली. विद्यार्थी भाषणे, आदिम संस्कृतीचा जागर करणा-या विविध गुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ. अनिताताई खाडे होत्या. यावेळी भंडारदरा बोटींग क्लब मित्र मंडळाकडून शाळांमधील १००% विद्यार्थ्यांना वह्या, अंकलिपी, पेन, पेन्सिल इ. सुमारे ४०००/- रु. किंमतीची बक्षीसे वाटप करण्यात आली. तसेच ग्रामपंचायत भंडारदरा तर्फे सर्व विद्यार्थ्यांना केळी व खाऊचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उपसरपंच गंगाराम इदे, माजी सरपंच व उन्नती सेवा मंडळाचे खजिनदार पांडुरंग खाडे, ग्रामसेवक दरेकर भाऊसाहेब, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य उपकेंद्र स्टाफ,शाळा व्यवस्थापन सदस्य व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीनिवास पोतदार, भाऊ गंभीरे, भाऊसाहेब भांगरे, पांडुरंग बारामते, मोहन कुसळकर व जयवंत पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.या स्तुत्य उपक्रमाचे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी जालिंदर खताळ,शेंडी बीट विस्तार अधिकारी श्री. वाव्हळ व कातळापुर केंद्राचे केंद्र प्रमुख पुनाजी धांडे यांचेकडून संयोजन समितीचे विशेष अभिनंदन होत आहे.