संजय भोसले
तालुका प्रतिनिधी, कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे. या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. आगामी काळात पावसाचा अंदाज पाहता प्रशासनाने सतर्क राहून युद्ध पातळीवर उपाययोजना करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी दिले. कोकण विभागातील पूरस्थितीचा आढावा श्री कल्याणकर यांनी दृकश्राव्य प्रणाली द्वारे घेतला. यावेळी ते म्हणाले की जिल्ह्यातील ज्या भागातून आपत्तीची माहिती मिळेल त्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेने पोहोचून नागरिकांना मदत आणि दिलासा देणे आवश्यक आहे. पूर येणाऱ्या भागात तात्पुरते निवारे बांधा, नगरपालिकांना रबरी बोट ,लाइफ जॅकेट्स तसेच आवश्यक साहित्य व इतर उपकरणे देऊन सक्षम करा. जिल्ह्यातील सामाजिक संस्थांची मदत घ्या .नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा. तसेच पावसाचा अंदाज पाहता सर्व यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवून परिस्थितीचा मुकाबला करण्याचे आवाहनही त्यांनी केले. जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आणि त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती आयुक्तांना दिली. जून पासून आतापर्यंत 1880 मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या 111 टक्के पाऊस झालेला आहे .पाच नद्या धोक्याच्या इशारा पातळीपेक्षा कमीने वाहत आहेत. किल्लारी प्रकल्पातून 260 क्युसेक्स एवढा पाण्याचा विसर्ग झालेला आहे. 232 घरांचे नुकसान झाले असून पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू आहे. भाताची 81% पेरणी पूर्ण झालेली आहे.102 गावे पूर बाधित आहेत. तर 20 दरडग्रस्त प्रमाण क्षेत्र आहेत. अशा ठिकाणी तहसीलदार नियमितपणे भेटी देत असून आत्तापर्यंत 232 नागरिकांना स्थलांतरित केले आहे. 45 गावे पूरग्रस्त आहेत पूर प्रतिबंधक योजनेअंतर्गत 10 ते 15 नद्यातून गाळ काढला असल्याचे सांगून संभाव्य परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.


