अजय महादेव राठोड
प्रतिनिधी, बाभूळगाव
बाभूळगाव : तालुक्यात दि. २२ रोजी झालेल्या संततधार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामध्ये कोपरा जानकर गावातील नदिकाठावरील सुमारे १५० लोक बेघर झाले आहेत. या लोकांचे पुनर्वसन करण्यात यावे असा ठराव कोपरा जानकर ग्राम पंचायतने घेवुन दि. २५ रोजी तहसिलदार यांना निवेदन दिले.अतिवृष्टीमुळे कोपरा जानकर गावातील नदिकाठावर असलेल्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने घरातील व्यक्तींना साहित्य, कपडे, भांडे अषी कोणतीही वस्तु बाहेर काढता आली नाही. जीवाच्या आकांताने या घरांमधील महिला, पुरूष, वृध्द, लहान मुले यांनी आपले घर सोडून सुरक्षित स्थळी आसरा घेतला. या लोकांची जेवणाची व राहण्याची व्यवस्था ग्राम पंचायतच्या वतीने गजानन महाराज मंदिरात करण्यात आली. दरम्यान येथील ग्राम पंचायतने दि. २४ रोजी विशेष आमसभा बोलावून बेघर झालेल्या लोकांचे पुनर्वसन करण्यात यावे या संबंधीचा ठराव घेतला. त्यामध्ये बेघर झालेल्या लोकांचे बाभूळगाव बसस्थानक येथे पुनर्वसन करण्याची मागणी प्रशासनाला करण्यात आली आहे. क्षणात होत्याच नव्हतं झाल्याने या लोकांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. शासनाने सर्वतोपरी मदत करावी अषी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. निवेदन देते वेळी सरपंच भाग्यश्री इंगोले, उपसरपंच प्रविण वाईकर यांचेसह गावकरी उपस्थित होते.


