अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगाव – छत्रपती संभाजीनगर ते नागपूर या द्रुतगती मार्गावरील जउळका रेल्वे गावानजीक (ता.मालेगाव) असलेल्या काटेपूर्णा नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.या पार्श्वभूमीवर २४ जुलै रोजी सामाजिक कार्यकर्ते सुभाष देवढे यांनी नागरिकांसह या पुलावरच रास्ता रोको आंदोलन छेडले.अलिकडच्या काळात रस्ते अपघाताच्या घटनांत वाढ होत असल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. रस्ते अपघातास खड्डेही कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर ते नागपूर या द्रुतगती मार्गावरून मोठ्या संख्येने अवजड वाहतूक होत असल्याने रस्ता व पूल सुस्थितीत असणे वाहनचालकांना अपेक्षीत आहे. या द्रुतगती मार्गावरील जउळका रेल्वे (ता.मालेगाव) गावानजीक असलेल्या काटेपूर्णा नदीच्या पुलावर सद्यस्थितीत मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्ता कामातील गजही बाहेर निघालेले असल्याने आणि पावसाचे पाणी खड्ड्यात साचत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे या ठिकाणी काटेपूर्णा नदी असल्याने वाहन अपघात झाल्यास मोठी हाणी होण्याची शक्यता अधिक आहे. असे असतानाही संबंधित यंत्रणा पुलावरील खड्डे दुरूस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.संबंधित यंत्रणेचे याकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुभाष देवढे पाटील यांनी गावकऱ्यांसह २४ जुलै रोजी या पुलावरच रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे काही वेळ वाहतूक प्रभावित झाली होती. तातडीने खड्डे बुजविण्यात यावे, पावसाळा संपल्यानंतर या ठिकाणी नव्याने पूल उभारण्यात यावा अन्यथा न्यायोचित मागण्यांसाठी संबंधित मंत्र्यांचा दालनासमोर उपोषण छेडण्याचा इशाराही देण्यात आला.