डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
परभणी.दि.21 : एक संवेदनशील अन् कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी म्हणून या जिल्ह्याच्या प्रशासकीय व अन्य क्षेत्रात अवघ्या दोन-सव्वादोन वर्षाच्या कारकिर्दीत मोठी छाप टाकणार्या सौ. आंचल गोयल यांची राज्य सरकारने टर्म पुर्ण होण्यापूर्वीच केलेली बदली परभणीकरांच्या दृष्टीने अक्षरशः धक्कादायक ठरली आहे.परभणीच्या जिल्हाधिकारी म्हणून सौ. गोयल यांची नियुक्ती झाली तेव्हाच या महिला व आयएएस दर्जाच्या अधिकार्यास काही लोकप्रतिनिधींद्वारे पडद्याआड मोठा विरोध झाला. त्याचा परिणाम सौ. गोयल यांना परभणीत दाखल झाल्यानंतरसुध्दा रुजू होण्याचीपूर्वीच परभणीतून मुंबईस माघारी परतावे लागले होते. परंतु परभणीकरांसह माध्यमांच्या प्रतिनिधींनी एका महिला व आयएएस दर्जाच्या अधिकार्या विरोधात या पध्दतीने केलेल्या विरोधासह दिलेल्या वागणूकीबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटल्या तेव्हा राज्य सरकारने सौ. गोयल यांना मुंबईतच परभणीच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे गोयल यांनी पदभार घेतला अन् पुन्हा परभणी गाठली.तेव्हाच सौ. गोयल यांच्या कारकिर्दीविषयी परभणीकरांमध्ये कमालीची उत्कंठता निर्माण झाली. सौ. गोयल यांनीही प्रारंभापासूनच आपल्या दमदार कारकिर्दीत महसूल प्रशासनावर मोठी पकड निर्माण केली. विशेषतः कार्यालयांना अचानक भेटी, पाहणी, चर्चेपाठोपाठ संबंधितांबरोबर हितगूज करीत सक्त सूचना व समजही दिली. त्याचा परिणाम महसूल यंत्रणा पूर्णतः सतर्क झाली. त्या पाठोपाठ अन्य यंत्रणासुध्दा अलर्ट झाल्या. सौ. गोयल यांनी महसूल बरोबरच अन्य सरकारी व निमसरकारी यंत्रणांवरसुध्दा मोठा प्रभाव टाकला. एक जिल्हा दंडाधिकारी व प्रमुख म्हणून संवेदनशील विषयात परफेक्ट असे ठोस निर्णय घेतले. शहरासह जिल्ह्यातील गुंठेवारी पध्दतीने बेकायदेशीररीत्या अशा जमीनीच्या खरेदी- विक्री व्यवहारावर कठोर भूमिका घेतली. त्याचा परिणाम दलालांसह त्या साखळीतील भ्रष्ट अधिकारी व कर्मचार्यांचे अक्षरशः धाबे दणाणले. सारे बेकायदेशीर व्यवहार पूर्णतः थंडावले होते. या पाठोपाठ जिल्ह्यातील अल्पवयीन मुलींचे होणारे विवाह सोहळे रोखण्याकरीता ठोस अशी पाऊले उचलली. त्यासाठी ‘बालविवाह मुक्त परभणी’ असे अभियानच राबवून त्याद्वारे जिल्हा, तालुका, सर्कल व खेड्या-पाड्यापर्यंतचे, वाडी-तांड्यावरचे बालविवाह सरकारी व निमसरकारी यंत्रणांच्या मदतीने पूर्णतः रोखले. त्यासाठी केलेले त्यांचे नियोजन हे निश्चितच कौतूकास्पद ठरले.पात्र शेतकर्यांना ऑनलाईन पध्दतीने कर्ज पुरवठा व्हावा, या दृष्टीने सौ. गोयल यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह अन्य राष्ट्रीयकृत बँकांना विश्वासात घेवून पाऊले उचलली, त्यामुळे पात्र शेतकर्यांना सहज व सुलभपणे पतपुरवठा झाला. सौ. गोयल यांच्या या ऑनलाईन कृषि कर्ज पुरवठ्याचा मोठा बोलबालाही झाला. राज्य सरकारने सुध्दा या नाविण्यपूर्ण उपक्रमाची दखल घेतली.सौ. गोयल यांनी जिल्ह्यातील दिव्यांगांना आधारकार्ड मिळावे, स्वस्त धान्य दुकानातून रेशनकार्ड, धान्य मिळावे या साठीची ही मोहिम यशस्वी केली. अलिकडेच परभणी जिल्ह्यातील ऐतिहा- सिक वास्तू व मंदिरांचा परिचय व्हावा, या दृष्टीने परभणी जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा या पुस्तकाच्या निर्मितीसाठी मोठे प्रोत्साहन व योगदानही दिले. तत्पूर्वी जिल्ह्यातील ऐतिहासिक बारवांच्या पुनर्जिवनाकरीता राबविलेल्या मोहिमेमागे भक्कम असे पाठबळ उभे केले. सौ. गोयल यांनी जिल्ह्यातील वाळू माफियांविरोधातही कठोर भूमिका घेतल्या. विशेषतः तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकार्यांनी वाळू माफियांना दिलेल्या पाठबळाच्या विरोधात विभागीय आयुक्तांकडे अहवाल सादर करीत या साखळीला मोठा तडाखा दिला. विधी मंडळात शुक्रवारीच जिल्हाधिकार्यांच्या या अहवालाबद्दल चर्चा सुध्दा घडली, हे विशेष.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेसह या वर्षीपासूनच्याच प्रवेश प्रक्रियेस मंजूरी मिळविण्यात वारंवार उद्भवलेल्या अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी गोयल यांनी सातत्यपूर्वक पाठपुरावा करीत सर्वार्थाने त्रुटी पूर्ण व्हाव्यात या दृष्टीने प्रयत्नांची पराकाष्टा केली. त्यामुळेच त्यांचे सेवानिवृत्त विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनीही जाहीरपणे कौतूक केले. बेस्ट ऑफिसर म्हणून शाबासकी सुध्दा दिली. परभणी जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्हा नेत्र रुग्णालय, जिल्हा स्त्रीरोग रुग्णालय तसेच अन्य इमारतींच्या पूर्ततेसह अन्य गोष्टींकरीताही सौ. गोयल यांनी सातत्याने पाठपुरावा केला.जिल्ह्यातील आपदग्रस्त शेतकर्यांना पिक विम्याची रक्कम मिळावी या दृष्टीनेही सौ. गोयल यांनी केलेल्या सकारात्मक प्रयत्नांना मोठे यश मिळाले. त्यामुळे शेतकर्यांच्या पदरात विम्याच्या कोट्यवधी रुपयांच्या रक्कमा पडल्या त्यासाठी सौ. गोयल यांनी लोकप्रतिनिधी व राजकीय पदासधिकार्यांबरोबरही समन्वय राखला.
सौ. गोयल यांनी जिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय स्तरावरील सर्व जबाबदार्या पूर्णपणे, यशस्वीपणे पार पाडतेवेळी स्वतःचा पूर्णवेळ दिला. सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारीसुध्दा सौ. गोयल यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून कामाचा झपाटा दाखवून दिला. सर्वसामान्य नागरीकांच्या तक्रारींची थेट दखल घेवून कामांच्या पूर्ततेकरीता केलेल्या प्रयत्नांमुळे त्या सर्वसामान्य नागरीकांमध्ये लोकप्रिय झाल्या.पंधरा दिवसांपासूनच बदलीबाबत सौ. गोयल यांची टर्म पूर्ण होण्यापूर्वीच बदली होणार या संदर्भात गेल्या पंधरा दिवसांपासूनच प्रशासकीय स्तरावर चर्चा सुरु होती. तर टर्म पूर्ण झाल्याशिवाय बदली होणार नाही, असेही म्हटले जात होते. परंतु, माशी कुठे शिंकली हे कळलेच नाही. सौ. गोयल यांची राज्य सरकारने परभणीतून नागपूरात बदली केली अन् परभणीत पदोन्नतीने आयएएस दर्जा मिळविलेल्या अधिकार्यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली.


