दिपक पगारे
शहर प्रतिनिधि, औरंगाबाद
औरंगाबाद : व्यवसायासाठी माहेराहून दहा लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत गर्भवती विवाहितेचा सासरच्या मंडळींनी छळ केला. त्याला कंटाळलेल्या विवाहितेने सोमवारी (ता.१२) सकाळी साडेसातच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना न्यू हनुमाननगरात घडली. पूजा अमोल त्रिभुवन (२०) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात सासरच्या सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील गारखेडा भागात राहणाऱ्या अमोल अण्णासाहेब त्रिभुवन याच्याशी शेतकरी सुभाष यादव महांकाळे (४२, रा. महांकाळ वडगाव, ता. श्रीरामपूर) यांची मुलगी पुजाचा विवाह १४ जून २०२० रोजी झाला. अमोल हा खासगी नोकरी करत असल्याने त्याला स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी व व्यवसायासाठी प्लॉट विकत घ्यायचा होता. त्यासाठी त्याच्यासह सासू सिंधुबाई, सासरा अण्णासाहेब यांनी पूजाला माहेराहून दहा लाख रुपये आणण्याची मागणी केली. तुझ्या आई-वडिलांकडे चांगली शेती आहे.
ते पैसे देऊ शकतात, तुझ्या हिश्याची शेती त्यांना विकायला सांग, असे म्हणत वारंवार पैशांची मागणी करत होते. त्यावरुन पूजाला नेहमी शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता. त्यामुळे गेल्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी महांकाळे हे शहरात आले. त्यानंतर पुजाला सोबत घेऊन ते गावी गेले. त्यानंतर काही दिवसांनी पुजाचे सासरे अण्णासाहेब, सासू सिंधुबाई, पती अमोल यांनी फोन करुन आता झाले गेले विसरुन जा, आम्ही यानंतर पूजाला त्रास देणार नाही, अशी गयावया केली. त्यामुळे वडिलांनी पाच महिन्यांपूर्वी पूजा हिला पुन्हा सासरी आणून सोडले. त्यानंतर काही दिवस पुजाला त्रास झाला नाही. पुढे ती गर्भवती राहिल्यानंतर तिच्याकडे पुन्हा दहा लाख रुपयांच्या मागणीचा तगादा सुरू करण्यात आला.
पती अमोल, सासरा अण्णासाहेब, सासू सिंधुबाई, नणंद भाग्यश्री मुन्ना महांकाळे, अंजू आणि जयश्री यांनी पुजाला त्रास दिल्यावर तिचे वडील पैसे देतील या उद्देशाने छळ सुरु केला. मात्र, सोमवारी सकाळी सातच्या सुमारास पूजाने बैठक खोलीतील पंख्याला साडीने गळफास घेतल्याची माहिती तिचे सासरे अण्णासाहेब याने महांकाळे यांना दिली. त्यामुळे महांकाळे कुटुंबिय लगेचच शहरात दाखल झाले. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.