छत्रपती संभाजीनगर : राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्यांची नावे गृह मंत्रालयाने नुकतीच जाहीर केली. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज ठाण्याचा समावेश असून सलग दुसऱ्यांदा या ठाण्याला हा बहुमान मिळाला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी सलग दुसऱ्या वर्षी प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह स्वीकारले, हे विशेष. याबद्दल पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी त्यांचे अभिनंदन केले. २०१६ मध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या कॉन्फरन्समध्ये देशपातळीवरील दहा सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्यांची निवड करण्यासंदर्भात केंद्रीय स्तरावर निर्णय घेण्यात आला होता. पोलिस अधिकाऱ्यांमधील निकोप स्पर्धा वाढावी तसेच कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध, दोषसिद्धी यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी हा निर्णय घेतला होता. देशपातळीवरील सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्यांच्या निवड प्रक्रियेत महाराष्ट्रातील पोलिस ठाण्यांचा समावेश व्हावा, यादृष्टीने राज्य पातळीवर प्रयत्न करण्यात आले. पोलिस ठाण्यांची कार्यक्षमता वाढविणे, कामगिरी सुधारणे, उत्कृष्ट पद्धतीने काम करणे, गुन्हेगारीला प्रतिबंध करणे, गुन्ह्यांचा तपास करणे, कायदा व सुव्यवस्था राखणे, त्यासाठी पोलिस अधिकारी, अंमलदार यांना प्रोत्साहित करणे आदीसाठी राज्य पातळीवर पाच सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्यांची निवड करण्यात येते. त्यांना सन्मानचिन्ह व रोख बक्षिस प्रदान केले जाते. त्याच धर्तीवर २०२१ या वर्षातील कार्य मूल्यांकन करून पाच सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्यांची निवड करण्यात आली आहे. अपर पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना यांनी सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्यांची यादी जाहीर केली.










